राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होणार का ? चालकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट !

सर्व रेस्टॉरंट व्यवसायिकांची पुन्हा एकदा बैठक घेऊन एसओपी फायनल करणार असं गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले

मुंबई (प्रतिनिधी): राज्यात आता अनलॉक-5 चा टप्पा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर रेस्टॉरन्ट्स असोसिएशनच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भेट घेतली. गेल्या सहा महिन्यांपासून रेस्टॉरन्ट्स बंद असल्याने प्रचंड नुकसान होत असल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. रेस्टॉरन्ट्स सुरू करण्याची कार्यपद्धती ठरवली जाईल आणि त्यानंतरच निर्णय घेतला जाईल असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

राज्य शासनाने रेस्टॉरन्ट्स सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरन्ट्स सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरन्ट्स व्यवसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते.

कोरोनाचे संकट मोठे असून या संकटकाळात हॉटेल आणि रेस्टॉरन्ट्स व्यवसायिक शासनासोबत असल्याचे समाधान वाटत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की,  आजही कोविडवर लस किंवा औषध उपलब्ध नाही त्यामुळे कोरोनासोबत जगतांना अत्यंत काळजीपुर्वक पुढे जावे लागत आहे. रुग्णांमध्ये पोस्ट कोविड लक्षणे दिसून येत आहेत. आर्थिक बाबींसाठी जबाबदारीने आपण काही पाऊले टाकायला सुरुवात केली आहे.

आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते ते आपण एकेक सुरु करत आहोत. व्यवहार बंद ठेवणे हा काही आवडीचा विषय असूच शकत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कर रुपात राज्य शासनाला मिळणारा महसूल ही बंद आहे. केंद्र शासनाकडून जीएसटीची काही हजार कोटी रुपयांची रक्कम मिळणे बाकी आहे.  या सर्व आर्थिक अडचणींची शासनास जाणीव आहे म्हणूनच मर्यादा पाळून आणि जबाबदारीचे भान ठेऊन व्यवहार सुरळित करण्याचा आपला प्रयत्न आहे.

जीवनशैलीत बदल करणे आवश्यक
आता सण उत्सव आणि पावसाचे दिवस आहेत. गर्दी होत आहे.. लोकांचा संयम हा देखील महत्वाचा विषय आहे. पण कोरोना सोबत जगतांना आता आपल्या प्रत्येकाला आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागणार आहे.  म्हणजे काय तर मास्क लावणे, हात धुणे,  शारीरिक अंतर राखणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. रेस्टॉरन्ट्स सुरु करतांना या तीनही गोष्टीची अत्यंत काळजी घेणे अत्यावश्यक ठरणार आहे रेस्टॉरंटमधील शेफ, सेवा देणारे व इतर कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक काळजी घेणे महत्वाचे राहणार आहे. त्यांनी मास्क लावणे, हात धुणे गरजेचे आहे. रेस्टॉरंटची सुरक्षितता आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी महत्वाच्या राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एकत्रित बसून मार्गदर्शक तत्वे अंतिम करा
या विषाणुने बाधित 80 टक्के लोकांना लक्षणे दिसून येत नसली तरी त्यांच्याकडून विषाणुचा प्रसार होऊ शकतो जी बाब गंभीर आहे हे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, शारीरिक अंतर पाळणे ही रेस्टॉरन्ट्ससाठीची रेसीपी आहे. आपले नाते विश्वासाचे असल्याचेही सांगतांना महाराष्ट्राला आपलं कुटुंब मानणारी प्रत्येक व्यक्ती या जबाबदारीचे भान ठेऊन यात सहभागी होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला तसेच सर्वांनी एकत्रित बसून मार्गदर्शक तत्वे अंतिम करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

सर्व रेस्टॉरंट व्यवसायिकांची पुन्हा एकदा बैठक घेऊन एसओपी फायनल करू असे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यावेळी सांगितले.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News