Uddhav Thackeray : ‘खोट्याचं नाटक बंद पाडा,’ भाजपच्या विकासरथावर ठाकरेंचा निशाणा

मुंबई : लोकसभा निवडणुकीला आता अवघे काही महिने शिल्लक आहेत, त्यामुळे भाजपकडून त्यांनी केलेल्या कामाचा प्रचार आणि प्रसार करायला सुरूवात झाली आहे. मागच्या 10 वर्षांमध्ये झालेली कामं जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपचा विकासरथ देशभरातल्या गावागावांमध्ये पोहोचवला जात आहे. भाजपच्या या विकासरथावर उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला आहे.

‘आता रथ फिरवत आहेत. चार कोटी घरं देणार आहेत, असं म्हणत आहेत. कुठून आलं हे? हे खोटं बोलत आहेत. आपल्या राज्यात आपल्याला वाटतं शेजारच्या गावात योजनेचा लाभ मिळाला असेल, मात्र कुणालाच काही मिळालं नाही. हे सगळं थोतांड आहे. हे गावागावात पोहोचलं पाहिजे. पुढचा काळ महत्त्वाचा आहे, खोट्याचं नाटक बंद पाडलं पाहिजे,’ असं उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.

याआधी भाजपचा विकास रथ कुडाळमध्ये आला असताना भाजप-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. विकास रथावर मोदी सरकार असा उल्लेख असल्याने महाविकासआघाडीच्या नगरसेवकांनी विरोध केला, त्यानंतर भाजप नगरसेवकही आक्रमक झाले, यानंतर दोन्ही गटांकडून बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली.

विकास रथावर “मोदी सरकार” असा उल्लेख असल्याने आमचा यात्रेला विरोध आहे, असं कुडाळ नगरपंचायतमधील उबाठा आणि महाविकास आघाडीच्या सत्ताधारी नगरसेवकांनी सांगताच भाजप नगरसेवकांनी याला जोरदार आक्षेप घेतला. भाजप कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार बाचाबाची होऊन धक्काबुक्की झाली, यामुळे कुडाळ नगरपंचायत पटांगणावर एकच गोंधळ माजला. यावेळी कुडाळ पोलिस आणि दंगल नियंत्रण पथकाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला.

Loading