काँग्रेसची सर्व बँक खाती गोठवली, पुढील सुनावणीपर्यंत तात्पुरता दिलासा

काँग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन यांनी म्हटलं होतं की, पक्षाच्या युवक काँग्रेसच्या खात्यांनाही गोठवण्यात आलंय. आतापर्यंत एकूण ९ खाती गोठवली आहेत. आम्हाला १४ फेब्रुवारीला याबाबत माहिती मिळाली. आम्ही जारी केलेले चेक बँकेकडून स्वीकारण्यात आले नाहीत. जेव्हा चौकशी केली तेव्हा काँग्रेसची खाती गोठवल्याचं लक्षात आलं.
– अजय माकन

नवी दिल्ली (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. काँग्रेस पक्षाची खाती गोठवण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते अजय माकन यांनी केला होता. दरम्यान, आयकर ट्रिब्युनलने सुनावणी प्रलंबित असेपर्यंत म्हणजेच बुधवारपर्यंत खात्यांवरील निर्बंध हटवले आहेत. अजय माकन यांनी दावा केला होता की, लोकसभा निवडणुकीच्या घोषणाआधी २०१८-१९ च्या आयकर रिटर्नचा दाखला देत काँग्रेसच्या अनेक खात्यांना गोठवण्यात आलंय. त्यातून २१० कोटी रुपयांच्या रिकव्हरीची मागणी केली गेलीय. अजय माकन यांनी पत्रकार परिषदेत आयकर खात्यावर बँक खाती गोठवल्याचा आरोप केला होता.

अजय माकन म्हणाले की, आयकर अपेलेट ट्रिब्यूनलमध्ये आम्ही याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी सुरू असून आमच्यावतीने वरिष्ठ अधिवक्ता आणि खासदार विवेक तन्खा बाजू मांडत आहेत. विवेक तन्खा यांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या खात्यांवरील निर्बंध बुधवारपर्यंत हटवण्यात आले आहेत. आम्ही आयकर अपेलेट ट्रिब्यूनलसमोर आमची बाजू मांडली आणि काँग्रेसची खाती फ्रीज केल्याचं सांगितलंय. त्यानतंर न्यायालयाने आदेश दिला असून पुढील सुनावणी बुधवारी असेल.

काँग्रेसची खाती नव्हे तर देशाची लोकशाही गोठली आहे असंही अजय माकन म्हणाले. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यासाठी दोन आठवडे उरले आहेत. अशा वेळी काँग्रेसची खाती गोठवून सरकारला काय दाखवायचंय असा सवाल अजय माकन यांनी विचारला.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News