अ‍ॅक्टिव्ह कोरोना बाधित रुग्णांपेक्षा रिकव्हर झालेल्यांची संख्या जास्त असणं म्हणजे यश नाही!

देशात कोरोना बाधितांच्या संख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. हे एक प्रकारे यश असल्याचे प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र, रिकव्हर झालेले रुग्ण हा कोरोना संसर्गचा प्रभाव कमी होत असल्याचा निकषच नाहीय. असं मत तज्ज्ञांनी मांडलं आहे.

नवी दिल्ली: देशातील कोरोनाबाधित रुग्णांची बरे होण्याची संख्या सध्याच्या अ‍ॅक्टिव्ह केसेसपेक्षा जास्त झाली आहे. हे एक प्रकारचे यश असल्याचे केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र, बरे झालेल्या रुग्णांचा आकडा अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा जास्त असल्याचं सांगून पाठ थोपटून घेणं योग्य नाही. कारण, रिकव्हर झालेले रुग्ण हा कोरोना संसर्गचा प्रभाव कमी होत असल्याचा निकषच नाहीय. तर दररोज आढळणारे नवे रुग्ण कमी होत जाणं हा निकष असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

देशभरातील कोरोनाबाधितांचा रिकव्हरी रेट (कोरोनामुक्त होण्याचा) 50 टक्क्यांहून अधिक झाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या चिंताग्रस्त वातावरणात ही आकडेवारी सकारात्मक असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. ही आकडेवारी खरी असली तरी याने कोरोना संसर्ग रोखण्यात यश मिळणार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी रोज नव्याने आढळणारी बाधितांची संख्या कमी होणे हेच यश आहे. मात्र, सघ्या असे चित्र ना राज्यात दिसत आहे ना केंद्रात. त्यामुळे ही आकडेवारी दिलासादायक दिसत असली तरी प्रत्यक्षात यामुळे कोरोना संसर्गाचा प्रभाव कमी झाला असे म्हणता येणार नाही.

कोरोना बाधित रुग्णसंख्येत भारत चौथ्या स्थानावर
देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता तीन लाखांहून अधिक झाली आहे. यामध्ये 1 लाख 45 हजार 779 रुग्णांवर सध्या उपचार (अ‍ॅक्टिव्ह केस) सुरु आहेत. तर एकूण 8884 कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 1 लाख 54 हजार 329 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जारी केली आहे. दरम्यान, दररोज रुग्णांचे आकडे झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी देभात तब्बल 11 हजार नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. परिणामी कोरोना बाधित रुग्णसंख्येत भारत चौथ्या स्थानावर आला आहे.

महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती
देशात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या ही एकट्या महराष्ट्रात आहे. त्यातही मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह लोकांची संख्या ही 55 हजारांच्या पुढे गेली आहे. राज्यात सलग तीन दिवसांपासून तीन हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. बाधित रुग्णांचा दररेजचा आकडा नवा उच्चांक करणारा आहे. तरीही डबलिंग रेट, रिकव्हरी रेट, ग्रोथ रेट असली आकडेवारी सांगून दिलासे देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांकडून येणाऱ्या प्रेसनोटमध्ये तर दररोज वाढलेले रुग्ण आणि एकूण आकडा किती हे सांगणंच बंद झालंय. सगळा भर, बरे झालेले किती आणि अॅक्टिव किती हे सांगण्यावर असतो. सकारात्मक सांगण्याच्या दवाबाखाली हे सुरुय असं वाटतं. पण आकड्यांनी एक बाजू झाकली तर दुसरी उघडी पडते.

Loading