सोनगडमध्ये साडेतीन हजार सोनं सापडल्याचा दाव्याला भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने फेटाळलं आहे
लखनौ : उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यात सोन्याची खाण सापडल्याची माहिती समोर आली होती. या खाणीत साडेतीन हजार टन सोनं असल्याचा दावा केला जात होता. मात्र, हे वृत्त भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने (जीएसआय) फेटाळले आहे (Geological Survey of India). जीएसआयचे महासंचालक एम. श्रीधर यांनी कोलकाता येथे याबाबत माहिती दिली. “सोनभद्रमध्ये साडेतीन हजार टन सोनं असू शकतं अशी कुठलीही माहिती आम्ही दिलेली नाही”, असं एम. श्रीधर यांनी स्पष्ट केलं.
“उत्तर प्रदेशच्या खनन विभागासोबत जीएसआयने 1988-99 आणि 1999-2000 मध्ये उत्खनन केलं होतं. या भागात काही प्रमाणात धातू मिळू शकतात असं त्या सर्वेक्षणातून समोर आलं होतं. या सर्वेक्षणात सोनेमिश्रित धातूमधून प्रतिटन 3.03 ग्रॅम सोनं असं एकूण 160 किलो सोनं मिळू शकतं, असं त्या अहावालात सांगण्यात आलं होतं. जीएसआयने हा अहवाल उत्तर प्रदेशच्या खनन विभागाकडे सोपवला होता जेणेकरुन ते पुढील कारवाई करतील”, असं श्रीधर (Geological Survey of India) यांनी सांगितलं.
सोनभद्रचे जिल्हा खाण विभागाचे अधिकारी के. के. रॉय यांनी शुक्रवारी (22 फेब्रुवारी) सोनभद्रमधील चोपन ब्लॉकच्या डोंगरात जवळपास 2943.26 टन आणि हरदीमध्ये जवळपास 646 किलो सोनेमिश्रित धातू सापडल्याचा दावा केला होता. यातून 1500 टनच्या आसपास सोनं निघण्याचा अंदाज वर्तवला जात होता.