राज्यात आणखी चार कोरोनाबाधित रुग्ण

अमेरिकेतून आलेल्या पुण्यातील २१ वर्षीय तरुणाला करोनाचा संसर्ग झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

मुंबई : पुण्यात एक, नागपूर येथे दोन आणि नगरमध्ये एक रुग्ण असे आणखी चार करोनाबाधित रुग्ण शुक्रवारी आढळले असून राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १८ झाली आहे. मुंबईत गुरुवारी हिंदुजा रुग्णालयात आढळलेल्या करोनाबाधित रुग्णाला शुक्रवारी कस्तुरबामध्ये हलविले असून त्याचे निकटवर्तीय आणि हिंदुजाच्या कर्मचाऱ्यांना कस्तुरबामध्ये विलगीकरण कक्षात ठेवले आहे.

अमेरिकेतून आलेल्या पुण्यातील २१ वर्षीय तरुणाला करोनाचा संसर्ग झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. नागपूरमध्ये याआधी अमेरिकेतून आलेल्या करोनाबाधित रुग्णाच्या निकटच्या अजून दोन जणांना संसर्ग  झाल्याचे तपासात आढळले आहे. सध्या पुण्यात सात, पिंपरी चिंचवड येथे तीन, मुंबईत तीन, ठाण्यात एक, नगरमध्ये एक आणि नागपूर येथे तीन करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. या सर्वाची प्रकृती स्थिर असून यांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन प्रतिबंधात्मक काळजी घेतली जात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

पुण्यात १८ जण तर मुंबईत ३५ जण रुग्णालयात दाखल आहेत. नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे १८, यवतमाळमध्ये नऊ आणि पिंपरी चिंचवड येथील वाय.सी.एम. रुग्णालयात तीन संशयित रुग्ण दाखल आहेत.

मुंबईत गुरुवारी हिंदुजा येथे  ६४ वर्षांचा रुग्ण आढळला असून तो दुबईहून आला होता. ८ मार्च रोजी हृदयासंबंधी त्रास होत असल्याने हिंदुजाला दाखल झाला होता. त्याच्या तपासण्या केल्यानंतर श्वास घ्यायला त्रास होत असून करोनाची लक्षणे आढळल्याने कस्तुरबामध्ये त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. १२ मार्चला त्याला करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळल्यानंतर राज्य सरकारच्या नियमावलीनुसार उपचारासाठी शुक्रवारी कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले आहे.

ठाणे येथे आढळलेला ३५ वर्षीय करोनाबाधित रुग्ण फ्रान्सहून आला असून त्याला कस्तुरबामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. त्याच्या निकटचे पत्नी, मुलगी सह अजून एकाला कस्तुरबामध्ये दाखल केले असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. ८ मार्चपासून हिंदुजा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या हिंदुजामधील आठ कर्मचाऱ्यांनाही कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले असून नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. हिंदुजा रुग्णालयातील आणखी ८५ कर्मचाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घरीच वेगळे राहण्यास सांगितले आहे. यांच्यामध्ये लक्षणे दिसून आल्यास तपासणी केली जाईल, अशी माहिती कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेच्या प्रमुख डॉ.जयंती शास्त्री यांनी दिली.

दुबईहून परतलेल्या मुंबई येथील ६४ वर्षीय व्यक्तीला करोनाची लक्षणे आढळल्याने शुक्रवारी कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले असून नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. तसेच त्याच्या संपर्कात आलेली पत्नी, मुलगी, जावई, इमारतीमधील सुरक्षारक्षक आणि घरकाम करणाऱ्या दोन महिलांना तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवले आहे. अहवाल येईपर्यंत त्यांना देखील देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. घाटकोपर येथे नौदलातील इराणहून आलेल्या ४५  जणांना देखरेखीखाली ठेवले असून त्यांना अद्याप करोनाची लक्षणे आढळलेली नाहीत. त्यांची देखरेख नौदल प्रशासन घेत आहे.

नगरमध्येही दुबईहून परतलेल्यास लागण

नगर-दुबईहून येथे परतलेला एक प्रवासी करोना विषाणूने बाधित झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या माहितीला दुजोरा दिला. त्याला येथील जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल केले असून निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, त्याच्यात गंभीर लक्षणे दिसलेली नाहीत, ती लक्षणे प्राथमिक स्वरूपाची आहेत. यापूर्वी  दुबईहून चौघा जणांचे कुटुंब काही दिवसांपूर्वी नगरला परतले होते. परंतु तपासणीमध्ये त्यांना करोनाची बाधा नसल्याचे आढळले होते. त्यांना चौदा दिवसांसाठी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. त्यांचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे पुण्याला पाठवण्यात आले होते. त्याचे अहवाल हाती आलेले नाहीत. परंतु त्यांच्या  व्यतिरिक्त एक जण करोना बाधित असल्याचे राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेच्या चाचणीत स्पष्ट झाले आहे.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News