टी २० महिला विश्वषक: श्रीलंकेवर सनसनाटी विजय

भारताने ए ग्रुपमधील अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेवर ३२ चेंडू राखून जोरदार विजय मिळवला आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिकंत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला असल्याचे पहायला मिळत आहे. कारण भारताच्या गोलंदाजांनी जोरदार मारा करत त्यांना ११३ धावांवर रोखण्यात यश मिळवले आहे.

भारतीय महिला संघाने शानदार फलंदाजीच्या जोरावर आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कपमधील सलग चौथा विजय मिळवला आहे. भारताने श्रीलंकेच्या संघाचा ७ गडी राखून सहज पराभव केला. श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापटू (३३) आणि दिलहारी (नाबाद २५) यांच्या खेळीमुळे श्रीलंकेने २० षटकात भारताला ११४ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना शफाली वर्माने धडाकेबाज ४७ धावांची खेळी केली आणि भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने साखळी फेरीतील चारही सामने जिंकत अ गटात अव्वल स्थान कायम राखले.

दिप्ती शर्माने डावाच्या सुरूवातीलाच भारताला पहिलं यश मिळवून दिलं. दिप्तीनं उमेशा थिमासीनीला दोन धावांवर बाद केलं. त्यानंतर चांगली भागीदारी होत असतानाच १७ चेंडूत १२ धावा करणारी हर्षिता माधवी त्रिफळाचीत झाली. राजेश्वरी गायकवाड निर्धाव षटक टाकत तिचा बळी टिपला. श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापटू हिने चांगली सुरूवात करत ३३ धावा केल्या. त्यात ५ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता, पण मोठा फटका मारताना ती झेलबाद झाली.