मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे आज, शनिवारी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्याजागी आता कोणाची वर्णी लागणार याची जोरदार चर्चा सुरु होती. मात्र, आता या चर्चेला पूर्णविराम मिळाले आहे..!
कारण आता मुंबई पोलिसांमध्ये मानाचे स्थान असलेल्या मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी परमबीर सिंह यांची वर्णी लागली आहे. पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतीत असलेल्या दहा ते बारा जणांना मागे टाकत परमबीर सिंह यांची निवड झाली असून राज्य सरकारकडून परिपत्रक काढून ही घोषणा केली आहे. तर बिपिन सिंग यांच्याकडे अपर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे काम सोपवण्यात आले आहे.
परमबीर सिंह हे यापूर्वी देखील मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतीत होते. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंह यांना डावलून संजय बर्वे यांची मुंबईच्या आयुक्तपदी नेमणूक केली होती. परमबीर सिंह यापूर्वी ठाण्याचे पोलीस आयुक्तही होते. मात्र, सध्या परमबीर सिंह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक आहेत.