अकोला : “तुषार पुंडकर हा प्रचंड दूरदृष्टी असलेला कार्यकर्ता होता, माझा आधार हरपला. त्याच्या हत्येने माझं मन हादरुन गेलंय”, अशी प्रतिक्रिया प्रहार संघनेचे प्रमुख आणि जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. प्रहार संघटनेचे पदाधिकारी तुषार पुंडकर यांच्यावर काल रात्री अज्ञातांनी गोळीबार करुन त्यांची हत्या केली. गोळीबारात जखमी झालेल्या तुषार पुंडकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
तुषार पुंडकर यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी खुद्द बच्चू कडू हे आज सकाळीच अकोल्याच्या आयकॉन हॉस्पिटलमध्ये आले होते. “तुषार पुंडकरने 2 वर्षात 20 वर्षाचं काम केलं. मात्र अतिशय थंड डोक्याने प्लॅन करुन, सुपारी देऊन त्याची हत्या करण्यात आली. ही हत्या सराईत गुन्हेगाराने केली. प्रचंड दूरदृष्टी असलेला हा माझा कार्यकर्ता होता. त्याच्या जाण्याने माझा आधार हरपला. माझं मन हादरुन गेलंय”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या तपासासाठी 15 जणांची टीम केली आहे. 15 ते 20 दिवसात मारेकरी पकडले जातील, असा विश्वासही बचू कडू यांनी व्यक्त केला.