पुणे: दुबईहून प्रवास करुन आलेले पुण्यातील 2 प्रवासी कोरोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकटसहवासितांचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरु असून या रुग्णांची मुलगी तसेच ज्या ओला टॅक्सीने या रुग्णांनी मुंबई-पुणे प्रवास केला. टॅक्सी ड्रायव्हर आणि त्यांचा विमानातील सहप्रवासी हे तीन निकटसहवासित देखील कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5 झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दुबई येथे जाऊन आलेल्या एका दाम्पत्यासह त्याची मुलगी आणि त्यांना घेऊन येणारा वाहनचालकाची पुण्यात तपासणी करण्यात आली. हे दाम्पत्य यवतमाळचे रहिवासी आहेत. सध्या पुण्याला असलेला या तिघांची तपासणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तिघांचीही प्रकृती स्थिर आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 5 रुग्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. कोरोनाचे रुग्ण जरी आढळून आले असले तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.
मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत 1101 विमानांमधील 1,29,448 प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार सर्व देशाहून येणा-या प्रवाशांची तपासणी राज्यातील या 3 विमानतळांवर करण्यात येत आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महानगरपालिकांकडून आवश्यक मनुष्यबळ विमानतळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या शिवाय बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. ब्युरो ऑफ इमिग्रेशन द्वारे इरण, इटली आणि दक्षिण कोरियामधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशात सध्या कोरोना उद्रेक मोठया प्रमाणावर सुरु असल्याने 21 फेब्रुवारी नंतर या देशातऊन आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकुण 591 प्रवासी आले आहेत.
18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत 304 जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी सर्व 289 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 5 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आजवर भरती झालेल्या 304 प्रवाशांपैकी 289 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या 12 जण पुणे येथे तर 3 जण मुंबईत भरती आहेत. नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले असून राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये 502 बेडस उपलब्ध आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीक्रण कक्षात भरती करण्यात येत आहे तर 12 मोठया प्रमाणावर करोना बाधित असणा-या देशातून आलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्यातील आरोग्य विभागास दैनंदिन स्वरुपात देण्यात येते. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण 591 प्रवाशांपैकी 353 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. मुंबई, पुणे, ठाणे यासह गडचिरोली, नांदेड, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर, वर्धा, सांगली, अहमदनगर, अमरावती, पालघर, जळगाव, चंद्रपूर, सातारा या जिल्ह्यातूनही बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.
सौजन्य: News18Lokmat