नवी दिल्ली : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये दोन भारतीय अधिकारी बेपत्ता असल्याची माहिती हाती येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानात भारतीय उच्चायोगाचे दोन अधिकारी गेल्या दोन तासांपासून बेपत्ता आहेत. त्यांचा सगळीकडे शोध सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीआयएसएफचे दोन चालक ड्यूटीसाठी बाहेर गेले होते, परंतु ते त्यांच्या कामावर पोहोचलेच नाहीत. त्यांचं कुठेतरी अपहरण झालं असावं अशी भीती व्यक्त केली जात आहे. चालकाचा शोध घेण्यात येत असून दोन जण बेपत्ता झाल्याची माहिती पाकिस्तान सरकारला देण्यात आली आहे.
याआधीही अशी घटना समोर आली. इस्लामाबादमध्ये एका भारतीय मुत्सद्दीला धमकावण्याचा प्रयत्न केला जात होता. आयएसआय एजंटनं भारतीय मुत्सद्दीचा पाठपुरावा केला. त्यांना हेरगिरी केल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी भारताने तीव्र विरोधही दर्शविला होता.
पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) च्या माध्यमातून इस्लामाबादमध्ये तैनात शीर्ष भारतीय मुत्सद्दी गौरव अहलुवालिया यांना त्रास देण्याचं प्रकरण समोर आलं होतं. गौरव अहलुवालिया यांना धमकावण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. तर गौरव अहलुवालिया यांचा दुचाकीवरून पाठलागही करण्यात आला.