मुंबईत पुन्हा लॉकडाउन होणार का ?

राज्यात अनेक ठिकाणी करोना रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारला चिंता सतावत आहे. नाशिक, औरंगाबाद, जळगाव, अमरावती अशा अनेक ठिकाणी प्रशासनाकडून करोना नियंत्रणात आणण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबईतही गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत असून लॉकडाउन लागू करण्यासंबंधी चर्चा सुरु आहे. दरम्यान पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मुंबईत लॉकडाउन लावण्यासंबंधी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबई मिररने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

मुंबईत लॉकडाउन लागू करण्यासाठी सध्या कोणत्याही प्रकारची घाई नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं इक्बालसिंह चहल यांनी सांगितलं आहे. मुंबईत चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्याने रुग्णसंख्या वाढली असल्याचं यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

महापालिकेने सध्या करोना चाचण्यांची संख्या २० हजारांपर्यंत वाढवली आहे. जानेवारीत जवळपास ११ ते १५ हजार चाचण्या होत होत्या. दरम्यान महापालिकेने नागरिकांना करोनासंबंधित नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. जर नियमांचं योग्य पालन केलं नाही तर पालिकेने कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

मुंबईत मंगळवारी १०५१ नव्या करोना रुग्णांची नोंद करण्यात आली. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या सध्या तीन लाख १२ हजार ४५८ वर पोहोचली आहे. करोनामुळे मुंबईत आतापर्यंत ११ हजार ५०६ जणांचा मृत्यू झाला आहे.