महाराष्ट्रात लॉकडॉऊनचा निर्णय 2 दिवसात – उद्धव ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या दोन दिवसात प्रशासनासोबत बैठक घेऊन लॉकडॉऊन बाबत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे. तिकडे नागपूरमध्ये मात्र 15 ते 21 मार्च लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहेत. तर MPSC ची राज्यसेवा पूर्व परीक्षाही आता पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

काही ठिकाणी लॉकडॉऊन करावा लागेल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. यासाठी प्रशासनासोबत महत्त्वाची बैठक लवकरच होणार असून या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. बुधवारी (10 मार्च) मात्र उद्धव ठाकरे यांनी लॉकडॉऊन लागू करण्याची सरकारची इच्छा नसल्याचं म्हटलं होतं.

अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पत्रकार परिषदेत लॉकडॉऊनचा निर्णय घेतला जाणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडॉऊन लागू करण्याची सरकारची इच्छा नसल्याचं स्पष्ट केलं होतं. “लॉकडॉऊन टाळायचा असेल तर नियमांचे काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे,” असंही ते म्हणाले होते. पण आज (11 मार्च) उद्धव ठाकरे यांनी लॉकडॉऊनचा निर्णय दोन दिवसात घेऊ असं म्हटलंय.

Loading