भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांची मायक्रोसॉफ्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती !

नवी दिल्ली: मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन या तंत्रज्ञान विश्वातल्या दिग्गज कंपनीचे नवे अध्यक्ष म्हणून भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांची नियुक्ती झाली आहे. ते 53 वर्षांचे आहेत. तसंच, कंपनीचे माजी अध्यक्ष जॉन थॉम्पसन यांची प्रमुख स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती केल्याचंही कंपनीने जाहीर केलं आहे. त्याच वेळी कंपनीने तिमाही लाभांश जाहीर केले असून, ते प्रति शेअर 56 सेंट्स एवढे असतील आणि 9 सप्टेंबर रोजी दिले जातील, असंही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

स्टीव्ह बामर यांच्यानंतर नाडेला 2014 पासून मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. 2014 मध्येच जॉन थॉम्पसन यांनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्याकडून कंपनीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. आता त्यांच्याकडून हा पदभार सत्या नाडेला यांच्याकडे आला असून, थॉम्पसन यांच्याकडे लीड इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

सत्या नाडेला यांच्या CEOपदाच्या कारकिर्दीत मायक्रोसॉफ्ट कंपनीची मोठ्या प्रमाणावर व्यवसायवृद्धी झाली. लिंक्डइन, नुआन्स कम्युनिकेशन्स, झेनीमॅक्स यांसारख्या कंपन्या अब्जावधी डॉलर्सना मायक्रोसॉफ्टने विकत घेतल्या. त्याची दखल घेऊन नाडेला यांना अध्यक्षपदी बढती देण्यात आली असावी. त्यांची या पदावर एकमताने नियुक्ती झाल्याचं ‘एनडीटीव्ही’च्या वृत्तात म्हटलं आहे. ‘त्यांचं व्यवसायाबद्दलचं सखोल ज्ञान योग्य धोरणात्मक संधी स्वीकारण्यासाठी आणि महत्त्वाच्या जोखीम ओळखण्यासाठी कंपनीला उपयोग होईल,’ असं मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

1975मध्ये स्थापन झालेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीला नवी उर्जा देण्याचं काम नाडेला यांनी केलं. 2014मध्ये नाडेला सीईओ झाले, त्या वेळी अॅपल (Apple) आणि गुगल (Google) या त्यांच्या स्पर्धक कंपन्यांनी मोबाइलवर लक्ष केंद्रित करून आघाडी घेतली होती. त्या स्पर्धेत कंपनीला आणण्याचं काम नाडेला यांनी केलं.

आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी कंपनीत मोठे संघटनात्मक बदल केले. 14 टक्के मनुष्यबळात कपात करून त्यांनी कॉर्पोरेट स्ट्रक्चर सुटसुटीत केलं. फिनलंडमधल्या नोकिया या कंपनीचा मोबाइल विभाग आपल्या कंपनीशी त्यांनी जोडून घेतला. क्लाउड कम्प्युटिंगला त्यांनी प्राधान्य दिलं. त्यांचं हे पाऊल कंपनीच्या वाढीसाठी साह्यभूत ठरलं. त्यांच्या काळात डेटा सेंटर्समधून सॉफ्टवेअर्स आणि सर्व्हिसेस रेंटवर उपलब्ध करून देण्यावर अधिक भर देण्यात आला. जगभरातल्या जवळपास 75 टक्के कम्प्युटर्समध्ये मायक्रोसॉफ्टची विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे. येत्या आठवड्यात विंडोजची नवी जनरेशन सादर केली जाणार आहे.

उच्च पदांवरचा हा बदल बिल गेट्स संचालकपदावरून पायउतार झाल्यानंतर जेमतेम वर्षभरातच झाला आहे. वर्षभरापूर्वी बिल गेट्स संचालक मंडळातून बाहेर पडले होते आणि आपण आता बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन या धर्मादाय संस्थेच्या कार्यावरच लक्ष केंद्रित करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं.

Loading