मुंबई (प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाकडून आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला जात आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तसं जाहीर वक्तव्य सुद्धा केलं आहे. स्वबळावर निवडणुका लढण्याच्या या नाऱ्यावरुन आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाला सणसणीत टोला लगावला आहे.
शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना ऑनलाईन माध्यमातून संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेस पक्षाला टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या संबोधनात म्हटलं, अनेक पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत. स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यासाठी असू नये. स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं. आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ, स्वबळावर लढणं हा आमचा हक्क आहे.
ममतांनी ताकद दाखवून दिली, त्याला स्वबळ म्हणतात:
निवडणुका येतात आणि जातात. ममतांनी ताकद दाखवून दिली, त्याला स्वबळ म्हणतात. बंगाली माणसांनी निर्भिडपणे मतं मांडलं, स्वत्व काय असतं हे बंगालने दाखवून दिलं. प्रादेशिक अस्मिता कशी जपायची याचं उदाहरण बंगालने घालून दिलं.