कोरोनाची लस न घेताच मिळालं डोस पूर्ण केल्याचं सर्टिफिकेट

देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता देशाची चिंता वाढत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्यासाठी मागील काही काळापासून देशात अनेक ठिकाणी लसीकरण मोहिमेला वेग देण्यात आला आहे. पण दरम्यान लसीकरणासंदर्भात गोंधळ निर्माण करणाऱ्या असंख्य घटना समोर येत आहेत. एरवी लसीकरणाचे दोन डोस पूर्ण केल्यानंतर कोरोना लसीकरणाचं प्रमाणपत्र देण्यात येतं.

मात्र काश्मीरमध्ये लशीचा एकही डोस न घेता, लसीकरणाचं सर्टिफिकेट थेट घरी आलं आहे. हे धक्कादायक सत्य समोर येताच नागरिकांनी प्रशासनाच्या अजब कारभारावर टीका करायला सुरुवात केली आहे. संबंधित घटना काश्मीरमधील आहे. याठिकाणी सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे येथे लसीकरण मोहिमेला वेग देण्यात आला आहे.

पण दुसरीकडे मात्र काही लोकांना लस दिली नसतानाही त्यांना सर्टिफिकेट देण्यात आलं आहे.  काश्मीरातील निशात ब्रेन परिसरातील राहणाऱ्या एका दाम्पत्यानं कोविन वेबसाईटवर जाऊन लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. मात्र लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्यापूर्वीचं दाम्पत्याला सर्टिफिकेट जारी करण्यात आलं आहे. हे केवळ एकाच दाम्पत्यासोबत घडलं नाही, तर काश्मीरात अशी अनेक प्रकरणं असल्याची माहिती उघड झाली आहे. पीडीबी नेते डॉक्टर हरबक्श सिंह यांच्या बाबतीतही असाच प्रकार घडला होता.

संबंधित दाम्पत्यांनी सांगितलं की, आम्ही लस घेण्यासाठी ब्रेन येथील लसीकरण केंद्रावर पोहोचलो. तेव्हा लस घेण्यापूर्वीचं आम्हाला मेसेज आला, ज्यामध्ये कोरोना लशीचा पहिला डोस घेतल्याचं म्हटलं होतं. दुसरीकडे असाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका युवतीनं सोशल मीडियावर पोस्ट करून प्रशासनाचा अजब कारभार चव्हाट्यावर आणला आहेत.

Loading