मुंबई (प्रतिनिधी): कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या रात्री 12 वाजल्यापासून ते 15 मे पर्यंत हा कडक लॉकडाऊन असणार आहे अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग
सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्याचं जाहीर केलं आहे. यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास 2 लाख नागरिक बाहेरून आले आहेत. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत 50 ते 60 नागरिकांना सामुदायिक संसर्ग म्हणजेच कम्युनिटी स्प्रेड झाला असल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे. जिल्ह्यातील सोनाळी आणि दिक्षी या गावांत कोरोनाचा समूह संसर्ग झाला आहे.
जिल्ह्यात येण्यापूर्वी स्वॅब टेस्ट बंधनकारक, पर्यटकांना बंदी
कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या नागरिकांना आधी स्वॅब टेस्ट करणे बंधनकारक असणार आहे. तसेच पर्यटकांसाठी जिल्हाबंदी असल्याचंही पालकमंत्र्यांनी म्हटलं आहे.
निर्बंधांचे उल्लंघन केल्यास कारवाई
15 मे 2021 पर्यंत हा कडक लॉकडाऊन असणार आहे आणि गेल्यावर्षी प्रमाणेच हा सुद्दा लॉकडाऊन असणार आहे. निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे.