पावसाचं रौद्ररुप! कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी, पुढील 3 तास महत्वाचे!

पावसाचं रौद्ररुप! कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी, पुढील 3 तास महत्वाचे!

मुंबई : राज्यात पावसाने रौद्ररुप धारण केले असून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पुढील 3 तास सातारा आणि पुण्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. यात माथेरान, खंडाळा, महाबळेश्वर तसेच रत्नागिरी, अलिबाग परिसरात अतिमुसळधारेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई आणि ठाण्यातही अधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तिकडे विदर्भात देखील नागपुरातील काटोल, रामटेक आणि उमरेडमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. वर्ध्यातील हिंगणघाट, ब्रह्मपुरी, पुसद, अकोला, अमरावती, बुलढाणा, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातही मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सांगली: सांगलीच्या चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. आज सकाळी आठ ते दुपारी 4 वाजेपर्यंत आठ तासात 75 मिलिमीटर पाऊस येथे बरसला. तर गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टी कायम आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झालीय. परिणामी आज दुपारी धरणाचे दोन दरवाजे उघडून 4 हजार 883 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. वीज निर्मिती केंद्रातून 1125 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण व वीजनिर्मिती असा दोन्ही मिळून सहा हजार आठ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.  मुसळधार पाऊस तसेच धरणातील मुख्य दरवाजातून तसेच वीज निर्मिती केंद्रातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. काही ठिकाणी नदीचे पाणी पात्राबाहेर गेले आहे. परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.  धरण पाणलोट क्षेत्रात तसेच चांदोली परिसरात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणातील विसर्ग कोणत्याही क्षणी आणखी वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन हे धरण प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन नदीचे पाणी पात्राबाहेर रस्त्यावर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी कॉजवे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नद्यांची पात्रे दुथडी भरून वाहत असुन नदीकाठच्या शेतीमध्ये पुराचे पाणी शिरल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

सातारा: महाबळेश्वर तालुका आणि कोयनेला प्रत्येक वर्षी पावसाची बॅटिंग पहायला मिळत असते. मात्र, महाबळेश्वर तालुक्यातील लामज असं गाव की जे एबीपी माझाने प्रशासकिय यंत्रणेच्या डायरीवर आणण्यासाठी भाग पाडलं. आणि राज्यातील लोकांनाही समजले की सर्वाधिक पाऊसाची नोंद ही लामज या गावातही होत असते. पावसाळ्यात सर्वाधिक पाऊसाची नोंद महाबळेश्वरच्या माथ्यावरची होत असते. या नोंदीवर या तालुक्याचे भवितव्य ठरवलं जात. मात्र, महाबळेश्वर तालुक्यातील अशीही काही गाव आहेत की, त्या ठिकाणचा पाऊस म्हणजे त्या गावातील लोकांसाठी जणू मृत्यूच दरवाजावर येऊन ठेपला आहे. कारण पावसाळा सुरु झाल्यापासून आज अखेर जवळपास चार हजार मिलीमिटर इतक्या पाऊसाची नोंद झाली आहेच. तर गेल्या चोविस तासात जवळपास पाचशे मिलीमिटर पाऊसाची नोंद झाली आहे.

अकोला: अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यात एका दिवसभरात विक्रमी 202.9 मिलीलीटर पाऊस झालाय. या ढगफुटीसदृष्य पावसाने संपुर्ण जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होत हाहाकार उडालाय. अकोला शहरातील मोर्णा नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरलेय. तर शहरातील अनेक वस्त्यांमधील घरातही पाणी शिरलेय. अकोला शहरातील खडकी, कौलखेड, न्यू खेतान नगर, चांदूर, गीतानगर, एमरॉल्ड कॉलनी, अनिकट, जुने शहरातील जाजूनगर अशा अनेक भागात पावसाचं पाणी घुसलंय. जवळपास एक हजार लोकांना घरातून रेस्क्यू करावं लागलंय. आज दुपारपर्यंत हे ऑपरेशन चाललंय. दुपानंतर पाणी ओसरल्यानंतर बाधित लोकांनी पुन्हा नव्याने आपला संसार उभा करायला सुरूवात केलीये. मात्र, पुरामुळे नुकसान झालेल्या परिवारांपर्यंत प्रशासन दुपारनंतरही पोहोचलेलं नव्हतंय.

उस्मानाबाद: उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार आहे. तुळजापूर तालुक्यातल्या नळदुर्ग मधल्या किल्ल्यातल्या प्रेक्षणीय असलेल्या पाणी महालाचा मादी धबधबा सुद्धा या पावसामुळे भरून वाहू लागला होता. कालपासून येडशीचा रामलिंग धबधब्याला पाणी आले आहे. जिल्ह्यांच्या एकुण सरासरीच्या 55 टक्के पाऊस झाला आहे. पुष्य नक्षत्रात पाणी महालातील धबधबा चालू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. बोरी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील झालेल्या पावसामुळे बोरी नदीचे पाणी पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे पाणी महालाच्या दोन धबधब्या पैकी मादी धबधबा ओसंडून वाहू लागला आहे.

बुलढाणा: अकोला व अमरावती परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठी असणाऱ्या पूर्णा नदीला महापूर आला असून काही वेळात जिल्ह्याचा संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्याशी संपर्क तुटू शकतो. जिल्ह्यात आज दिवसभर पावसाने उघडीप दिली असली तरी मात्र पूर्णा नदीला आलेल्या महापुरामुळे जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात मात्र शेतीच नुकसान झालंय. खिरोडा गावाजवळ असलेल्या शेगाव संग्रामपूर मार्गावरील पुलाला आता पाणी लागलं असून काही वेळात या मार्गावरील वाहतूक बंद होऊ शकते.

पुणे: खडकवासला धरण 100% भरल्यानंतर आता मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बुधवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, वरसगाव, पानशेत या धरणातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. खडकवासला धरण शंभर टक्के भरल्याने पूर्ण समृद्धीने वाहू लागले आहे. या खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात 2466 क्युसेक वेगाने विसर्ग सुरु करण्यात आले आहे.

पुणे-मुंबई धावणारी डेक्कन क्वीन उद्या सकाळी धावणार नाही:
पुणे-मुंबई धावणारी डेक्कन क्वीन उद्या सकाळी धावणार नाही. लोणावळा ते कर्जत दरम्यान अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने आणि रेल्वे मार्गखालील भाग वाहून गेल्याने असा निर्णय घेण्यात आलाय. डेक्कन क्वीन आज सायंकाळी पाच वाजता मुंबईवरून पुण्याकडे रवाना होते. पण तिथून ती आज धावणार नसल्याने उद्या ती पुण्यातून मुंबईकडे धावणार नाही हे स्पष्ट झालंय. तशी माहिती पुणे रेल्वेने दिली आहे.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News