क्राइम ब्रांचमधून सचिन वाझे यांची बदली
मुंबई: मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरुन सध्या विरोधकांच्या निशाण्यावर असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची बदली होणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर निवेदन देण्यासाठी अनिल देशमुख विधानपरिषदेत उपस्थित होते. यावेळी त्यांनी सचिन वाझे यांची क्राइम ब्रांचमधून बदली करुन इतर ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती दिली. विरोधक मात्र अटकेच्या मागणीवर ठाम असून यावेळी सभागृहात झालेल्या गदारोळानंतर कारवाई स्थगित करण्यात आली.
अनिल देशमुख यांनी निवदेनाच्या सुरुवातीला राज्यातील गुन्हेगारीची आकडेवारी दिली. मात्र यावरुन विरोधकांनी गदारोळ घालत सचिन वाझेंवर काय कारवाई करणार आहे अशी विचारणा करत त्यावर बोलण्याची मागणी केली. अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं की, “सचिन वाझेंवर नियमानुसार कारवाई होईल. सध्या क्राइम ब्रांच जिथे ते कामाला आहेत तिथून हलवून दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येईल”. निष्पक्षपणे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारावई करण्यात येईल असंही यावेळी त्यांनी सांगितलं.
अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंची बदली होणार असल्याची घोषणा केल्यानंतरही विरोधकांचा गदारोळ कायम होता. बदली नाही तर निलंबन करा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.