मुंबई (वृत्तसंस्था): गेल्या दीड वर्षांपासून देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातलं आहे. दीड वर्षानंतरही शास्त्रज्ञांना कोरोना विषाणूला पूर्णपणे समजून घेता आलं नाही. विषाणूच्या बाबतीत दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यामुळे देशाच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. कोरोना विषाणूनंतर देशात म्युकरमायकोसीस अर्थातचं ब्लॅक फंगसचा धोका वाढत आहे. शिवाय अनेक ठिकाणी व्हाईट फंगसचे रुग्ण देखील आढळले आहेत. यानंतर आता ग्रीन फंगसचा देखील रुग्ण आढळला आहे.
मध्य प्रदेशात ब्लॅक आणि व्हाईट फंगसनंतर आता ग्रीन फंगसचा देखील रुग्ण आढळला आहे. इंदौरच्या अरविंदो रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 34 वर्षीय विशाल श्रीधर यांना ग्रीन फंगसची लक्षणं आढळली आहेत. विशालला यापूर्वी कोरोना झाला होता. कोरोनातून बरं झाल्यानंतर तो पोस्ट कोविडचा रुग्ण झाला. उपचारादरम्यान, त्याच्या फुफ्फुसात आणि सायनसमध्ये एस्परगिलस फंगस अर्थातचं ग्रीन फंगस आढळला आहे.
फुफ्फुसात 90 टक्के संसर्ग झाल्यानंतर विशालला सोमवारी चार्टर्ड विमानानं मुंबईला आणण्यात आलं आहे. तेथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ब्लॅक फंगसपेक्षा ग्रीन फंगस अधिक धोकादायक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, दीड महिन्यांपूर्वी विशाल जेव्हा उपचारसाठी याठिकाणी आला, तेव्हा त्याच्या उजव्या फुफ्फुसात पूर्णपणे पू भरला होता. डॉक्टरांनी या आजारावर शक्य तितक्या प्रकारे उपचार करण्याचा प्रयत्न केला. तरीही दीड महिन्यांच्या उपचारानंतर, रुग्णात भिन्न लक्षणं दिसत होती. त्याचा ताप 103 अंशांपेक्षा कमी येत नव्हता. त्याची प्रकृतीही चिंताजनक होती.
एस्परगिलस फंगस म्हणजे काय?
एस्परगिलस फंगसला सामान्यत: यलो फंगस आणि ग्रीन फंगस म्हणून ओळखलं जाते. कधीकधी याला ब्राऊन फंगस म्हणुन देखील संबोधलं जातं. इंदौर मेडिकल कॉलेजच्या मायक्रोबायोलॉजीच्या विभागप्रमुख अनिता मुथा यांनी सांगितलं की, देशात अशाप्रकारची ही पहिलीच घटना आहे. याचा परिणाम फुफ्फुसांवर वेगानं होतं आहे. याबाबत अधिक संशोधन केलं जात आहे.