कम्पोझिशन करदात्यांसाठी जीएसटी नेटवर्कने (GSTN) एक नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्या कम्पोझिशन करदात्यांची लाएबलिटी NIL आहे त्यांना आता एसएमएस (SMS) सुविधा वापरून त्यांचा जीएसटी रिटर्न (GST Return) भरता येणार आहे.
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2020 : कम्पोझिशन करदात्यांसाठी जीएसटी नेटवर्कने (GSTN) एक नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्या कम्पोझिशन करदात्यांची लाएबलिटी NIL आहे त्यांना आता एसएमएस सुविधा वापरून त्यांचा जीएसटी रिटर्न भरता येणार आहे. ज्या करदात्यांची वार्षिक उलाढाल 1.5 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा कमी असते त्यांना कम्पोझिशन करदाते (Composition Taxpayers) म्हटलं जातं. त्यांना दर तिमाहीला जीएसटी रिटर्न भरावा लागतो पण त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिटचे कोणतेही फायदे मिळत नाहीत. कम्पोझिशन करदात्यांसाठी जीएसटीचा दर 1 टक्का, 5 टक्के आणि 6 टक्के असा आहे.
जीएसटी नेटवर्कने या नव्या सेवेबद्दल माहिती दिली असून त्यानुसार कम्पोझिशन करदाते त्यांचं जीएसटीचं NIL स्टेटमेंट CMP-08 या अर्जाद्वारे एसएमएसच्या माध्यमातून भरू शकतात. हे विवरणपत्र भरण्यासाठी करदात्याला जीएसटी पोर्टलमध्ये लॉगइन करण्याचीही आवश्यकता नाही. जीएसटीएनने यासंबंधीच्या पत्रकात म्हटलं आहे, ‘ या सेवेचा फायदा घेण्यासाठी करदात्यांनी विहित नमुन्याप्रमाणे एसएमएस पाठवावेत. जर दिलेल्या नमुन्याप्रमाणे करदाते एसएमएस पाठवू शकले नाहीत तर त्यांचा रिटर्न भरला जाणार नाही.’
जर तुम्ही कम्पोझिशन करदाते आहात आणि एसएमएसद्वारे जीएसटी भरत आहात तर तुम्ही खाली दिलेल्या पद्धतीने तुमचा अर्ज भरा:
-तुमच्या फोनमध्ये मेसेजेसवर क्लिक करून एक नवा मेसेज बॉक्स उघडा.
NIL C8 GSTIN Return Period टाइप करा.
-हा मेसेज 14409 क्रमांकावर पाठवा.
-तुम्हाला 6 अंकी व्हेरिफिकेशन कोड येईल.
-तुमचा CMP-08 अर्ज कन्फर्म करण्यासाठी तो 6 अंकी व्हेरिफिकेशन कोड 14409 या क्रमांकावर एसएमएस करा.
-जीएसटी पोर्टलकडून तुम्हाला Application Reference Number (ARN) असणारा ई-मेल आणि एसएमएस येईल.
यानंतर ही एसएमएस पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. नंतर तुम्ही जेव्हा जीएसटी पोर्टलवर लॉगइन करून तुमच्या CMP-08 अर्जाचं स्टेटस पाहाल तेव्हा त्याठिकाणी अर्ज Filed झालेला दिसेल. जीएसटीएन ही विनानफा बिगर सरकारी कंपनी असून ती केंद्र आणि राज्य सरकारांना इनकम टॅक्स सेवा आणि पायाभूत सुविधा पुरवते. करदात्यांना मदत करण्यासाठीही ही कंपनी काम करते. केवळ कम्पोझिशन करदात्यांसाठीच एसएमएसद्वारे जीएसटी रिटर्न भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.