एकनाथ खडसे यांच्यावर EDची मोठी कारवाई, येथील कोट्यवधींची मालमत्ता जप्त
मुंबई (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) एकनाथ खडसे यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीनं ही कारवाई केली आहे. एकनाथ खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांची गेल्या काही दिवसांपासून चौकशी ईडीकडून केली जात आहे. एका प्रकरणात खडसे यांच्या जावयाला ही ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता एकनाथ खडसेंवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
MIDC अधिकाऱ्यानं जबाबात मोठा खुलासा केला. या खुलासामुळे एकनाथ खडसे याचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली होती. जमिनीचे भाव कमी करायला गिरीशने भाग पाडले होते. 22 कोटींची जमीन 3.75 कोटींना विकण्यास दबाव होता, असं अधिकाऱ्यानं आपल्या जबाबात म्हटलं आहे. तसंच शासकीय महसूल बुडवण्यासाठी दबाव केला होता. जमिनीची किंमत कमी दाखवल्यानं स्टॅम्प ड्युटी देखील कमी भरावी लागली. निबंधक विभागाने जमिनीचे हस्तांतर करण्यास नकार ही दिला होता, असं अधिकाऱ्यानं म्हटलं आहे.
2016 मध्ये महसूलमंत्री असताना खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथील एक भूखंड विकत घेतला, असा आरोप ईडीनं केला आहे. या भूखंडाचा बाजारभाव 31 कोटी रुपये असताना गिरीश यांनी तो अवघ्या तीन कोटी रुपयांना विकत घेतला. हा भूखंड MIDCच्या मालकीचा होता, असं ईडीनं म्हटलं आहे.
त्यामुळे इतक्या कमी किंमतीत व्यवहार कसा काय झाला? तसंच गिरीश यांनी तो विकत घेण्यासाठी गोळा केलेल्या तीन कोटी रुपयांचा Source काय? या सवालांच्या आधारे ईडीनं तपास सुरु केला होता. दरम्यान आज एकनाथ खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.