तुम्हाला या “हलमा” परंपरेबद्दल माहित आहे का ?

परंपरा जुनीच पण उपयोग मात्र आजही तितकाच परिणामकारक! काम काय करायचं ते तज्ज्ञाने सांगायचं आणि प्रत्यक्ष कामात लोकसहभाग, असं काम केलं तर ते नक्कीच शाश्वत यश देतं.

डॉ. उमेश मुंडल्ये
तुम्हाला भिल्ल लोकांची “हलमा” परंपरा माहिती आहे का?भिल्ल समाजात ही वैशिष्ट्यपूर्ण परंपरा चालत आली आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात काही संकट येतं आणि तो सर्व प्रयत्न करूनही त्यावर मार्ग काढून त्यातून बाहेर येऊ शकत नाही, तेव्हा तो समाजाच्या पंचमंडळाला बोलावून “हलमा” बोलवायला सांगतो.

हलमा म्हणजे काय, तर समाजाची एक बैठक बोलावली जाते. त्यात तो संकटात असलेला माणूस त्याचा प्रश्न सांगतो, त्याने त्यावर उपाय शोधायला काय काय केलं हे सांगतो. आणि शेवटी तो म्हणतो की आता माझ्या एकट्याच्या ताकदीबाहेर आहे यातून बाहेर पडणं, मी हरलोय या संकटापुढे.पण समाज त्याला हरू देत नाही. उपस्थित लोकांपैकी लोक पुढे येऊन आपापली मदत देऊ करतात. उदा. एखाद्याच्या घराची पूर्ण पडझड झाली वादळात, आणि तो ते परत बांधू शकत नसेल तर एखादा म्हणतो मी लाकूड देतो सगळं लागणारं, कोणी शेतीसाठी बैलजोडी देतो, कोणी बियाणं लागलं तर ते देतो, अशी वस्तुरूपाने आवश्यक मदत केली जाते आणि त्या संकटातून माणसाला बाहेर पडण्यासाठी ताकद दिली जाते. याची परतफेड कशी करायची? तर संकटातून बाहेर आल्यावर त्या माणसाने सगळ्यांना जेवण द्यायचं आणि दुसऱ्या माणसाला पुढच्या वेळी मदतीची गरज लागली तर पुढाकार घ्यायचा. ही परंपरा कित्येक पिढ्या चालू आहे.आता या परंपरेचा वापर सध्या कसा केलाय ते बघूया.

मध्य प्रदेश मधल्या झाबुआमध्ये हा नवीन विचार आला आणि त्यावर प्रत्यक्ष कामही सुरू झालं. जसं हलमा बोलावणं हे वैयक्तिक संकटासाठी असतं, तसं ते पर्यावरणासाठी का नको?, असा प्रश्न विचारून शिवगंगा संघटन या संस्थेने पुढाकार घेऊन लोकांना हे पटवलं की सध्याचं जलसंकट हे पूर्ण समाजावर आलेलं संकट आहे आणि वैयक्तिक कोणी काम करून, कोणा एका संस्थेने काम करून किंवा केवळ सरकारी मदतीवर यातून बाहेर पडणं शक्य नाही. त्यामुळे समाजावर किंवा गावावर आलेलं संकट दूर करण्यासाठी पाण्यासाठी आणि पर्यावरणासाठी हलमा असा नवीन कार्यक्रम का सुरू करू नये? एवढी चांगली परंपरा समाजासाठी का वापरायची नाही? हा विचार पटून भिल्ल समाजाने काम चालू केलं.भिल्ल लोक डोंगर हे शिवस्वरूप मानतात. त्याचा उपयोग करून शिवगंगा संघटन संस्थेने असा विचार मांडला की या डोंगररूपी शिवाच्या जटा मोकळ्या होत नाहीत तोपर्यंत गंगा अवतरणार नाही. आणि मग आखला गेला जलसंधारणाचा आणि गंगावतरणाचा सामूहिक प्रयत्न.आत्तापर्यंत ३०० पेक्षा जास्त गावांमधे असं काम केलं गेलं आहे.

४००० पेक्षा जास्त तलाव, बांध, बंधारे, समतल चर, इत्यादि रचना तयार करून त्या त्या भागातील पाणीप्रश्न सोडवला गेला आहे. ज्या गावांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागतो अशा गावांमधे दरवर्षी हा कार्यक्रम होतो.आज आणि उद्या (२९ फेब्रुवारी – १ मार्च) झाबुआमध्ये हाथिपावा नावाच्या भागात हा कार्यक्रम आहे. ५०० गावांमधे जागृती करून २०००० पेक्षा जास्त लोक एकत्र येऊन डोंगरांवर ४०००० समतल चर खोदणार आहेत. यात देशभरातून लोक सहभागी होणार आहेत.सरकारी मदतीवर अवलंबून राहणाऱ्या, प्रत्येक संकटासाठी कोणीतरी मदत करेल म्हणून वाट पाहणाऱ्या लोकांसाठी किंवा काय करून प्रश्न सुटेल हे न कळणाऱ्या लोकांसाठी “हलमा” परंपरा आणि त्याचे परिणाम ही एक नवीन संधी आहे.आपल्याकडे म्हण आहेच की, गाव करेल ते राव काय करेल!चौकसपणे पाहिलं तर अशा अनेक गोष्टी आपल्याला शहाणपण देत असतात. जेवढं घेऊ तेवढं कमी आहे.

त्यासाठी फक्त मोकळ्या मनाने विचार करायची इच्छा हवी आणि प्रत्यक्ष काम करायची तयारी हवी. प्रश्न सुटतात, काही लगेच सुटतात, काहींना वेळ लागतो. पण उत्तर मिळतंच आणि फायदाही मिळतो.

Loading