कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत गेल्या 24 तासांमध्ये नवे रुग्ण वाढल्यामुळे खळबळ उडाली आहे.
मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातही सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळले आहे. मुंबईच्या उपनगरातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात एकाच दिवशी 6 रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत गेल्या 24 तासांमध्ये नवे रुग्ण वाढल्यामुळे खळबळ उडाली आहे. डोंबिवली परिसरात 5 रुग्ण तर कल्याणमध्ये 1 रुग्ण आढळला आहे. डोंबिवलीतील 5 रुग्ण हे तुकारामनगर परिसरातील असल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे.
या सहा रुग्णांच्या संपर्कात आलेल्या घरातील सदस्य, परिसरातील नागरिक आणि इतर लोकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांचीही तपासणी केली जाणार आहे. कल्याण डोंबिवली परिसरात 9 एप्रिलपर्यंत कोरोनाबाधितांची संख्याही 43 वर पोहोचली होती. आज यामध्ये या नव्या 6 रुग्णांचा भर पडला आहे.
दरम्यान, कल्याण डोंबिवली परिसरात आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण चालू असून नागरिकांनी घाबरून न जाता सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्यास त्वरीत महापालिकेच्या रूग्णालयाशी संपर्क साधावा. महापालिकेच्या आरोग्य पथकास सहकार्य करावे तसंच अधिक माहितीकरीता बाई रूक्मिणीबाई रूग्णालय, कल्याण येथील 0251- 2310700 व शास्त्रीनगर सामान्य रूग्णालय, डोंबिवली येथील 0251- 2481073 व 0251- 2495338 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असं आवाहनही महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.