परिस्थिती गंभीर! 8 राज्यांतच डेल्टा व्हेरिएंटची 50 टक्के प्रकरणं; सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात

परिस्थिती गंभीर! 8 राज्यांतच डेल्टा व्हेरिएंटची 50 टक्के प्रकरणं; सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): देशातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरू लागल्याचं दिलासादायक चित्र दिसत असतानाच दुसरी एक चिंता वाढत चालली आहे. दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणूच्या B.1.617.2 अर्थात डेल्टा व्हेरिएंटने धुमाकूळ घातला होता. मात्र त्यात सातत्याने म्युटेशन होत असून, अशा म्युटेशनद्वारे तयार झालेल्या डेल्टा व्हेरिएंटने आता डेल्टा प्लस हे अधिक रौद्र रूप धारण केलं आहे. हा व्हेरिएंट घातक समजला जात आहे.

कारण लशीमुळे तयार झालेल्या अँटीबॉडीज आणि नैसर्गिक संसर्गामुळे तयार झालेली प्रतिकारशक्ती (Immunity) या दोन्ही गोष्टी निष्प्रभ ठरवण्याची क्षमता या डेल्टा प्लस व्हॅरिएंटमध्ये असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. डेल्टा व्हेरिएंटचे देशातले 50 टक्के रुग्ण आठ राज्यांत सापडले आहेत. त्यात महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि तेलंगणा या राज्यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय महासाथ नियंत्रण केंद्राचे संचालक डॉ. सुजितकुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, देशात आतापर्यंत 21,109 सॅम्पल्समध्ये गंभीर व्हेरिएंट असल्याचं दिसून आलं आहे. त्यात अल्फा व्हेरिएंट 3969 नमुन्यांत, बीटा व्हेरिएंट 149 नमुन्यांत, गॅमा व्हेरिएंट एका नमुन्यात, तर डेल्टा आणि कप्पा व्हेरिएंट 16238 नमुन्यांत सापडल्याचं त्यांनी सांगितलं.

35 राज्यांतल्या 174 जिल्ह्यांत डेल्टा व्हेरिएंट सापडला आहे. नव्यानेच समोर आलेल्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आतापर्यंत 12 राज्यांमध्ये आढळले आहेत. या 12 राज्यांतल्या 49 सॅम्पल्समध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळल्याचं स्पष्ट झालं आहे. हा व्हेरिएंट घातक असल्याचं अलिकडेच सरकारने जाहीर केलं होतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अल्फा व्हेरिएंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत होते. मे-जूनमध्ये मात्र 90 टक्के सॅम्पल्समध्ये डेल्टा व्हेरिएंट असल्याचं स्पष्ट होत आहे. देशात आतापर्यंत 120 म्युटेशन्स झाल्याचं दिसून आलं असून, त्यापैकी 8 व्हेरिएंट्स घातक आहेत. बहुतांश भारतीय कोरोना रुग्णांमध्ये हे 8 व्हेरिएंट्सच आढळत आहेत.

डिसेंबर 2020 मध्ये डेल्टा व्हेरिएंटचा रुग्ण केवळ महाराष्ट्रात, एका जिल्ह्यात आढळला होता. मार्च 2021 पर्यंत तो देशातल्या 54 जिल्ह्यांत पोहोचला, तर आता तो 174 जिल्ह्यांत पोहोचला आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सर्वाधिक 21 रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तमिळनाडूत 9, मध्य प्रदेशात 7, पंजाबात 2, गुजरातेत 2, केरळमध्ये तीन, तर आंध्र प्रदेश, ओडिशा, राजस्थान, जम्मू-काश्मीर आणि कर्नाटक या राज्यांत डेल्टा प्लसचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

डेल्टा प्लसच्या धोक्यामुळे महाराष्ट्रात नवे दिशानिर्देश जाहीर करण्यात आले आहेत. केवळ आरटीपीसीआर चाचण्यांच्या आधारे निर्बंध हळूहळू शिथिल किंवा कडक केले जाणार आहेत. डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्यास निर्बंध कडक केले जाऊ शकतात, असे संकेत देण्यात आले आहेत.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News