मुंबई (प्रतिनिधी): राज्याच्या राजकारणात महत्वाची घडामोड होत असल्याचं पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात नेमक्या कुठल्या विषयावर चर्चा होत आहेत याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. मात्र, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरूवात झाली आहे.
शरद पवारांसोबतच राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब हे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. काही वेळापूर्वीच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले होते. तिन्ही नेत्यांमध्ये बैठक झाल्यावर आता शरद पवार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत.
अनिल देशमुखांवरील कारवाई संदर्भात भेट?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरू असलेली ईडीची कारवाई आणि त्यांच्या दोन्ही पीएंना झालेली अटक यामुळे देशमुखांची अडचण वाढताना दिसत आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीची सुरू असलेली कारवाईच्या संदर्भात भेटीत चर्चा होत असल्याचं वृत्त समोर येत आहे.
यासोबतच शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाई नंतर त्यांनी भाजपसोबत जुळवून घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर सुद्धा चर्चा होत असल्याचं बोललं जात आहे. पुढील महिन्यात राज्य विधिमंडळाचे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात विरोधक विविध मुद्द्यांवरुन घेणार असल्याचं लक्षात घेता राजकीय स्ट्रॅटेजी करण्यासाठी काय पावलं उचलावी यावरही चर्चा होत असल्याचं बोललं जात आहे.