पुण्यातील दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रशासन आणखी सतर्क झालं आहे. आतापर्यंत 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर
मुंबई : पुण्यातील दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रशासन आणखी सतर्क झालं आहे. आतापर्यंत 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील दाम्पत्याच्या मुलीला, नातेवाईकाला आणि ते ज्या टॅक्सीतून आले, त्या टॅक्सीचालकाला कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासकीय पातळीवर सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. राज्याचं विधीमंडळ अधिवेशन सुरु आहे. त्यामध्ये आज याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
अजित पवार म्हणाले, “पुण्यातील एक दाम्पत्य दुबईहून मुंबईला आणि तिथून टॅक्सीने पुण्याला आले. त्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर, विभागीय आयुक्तांनी ते ज्या टॅक्सीने आल्या त्या ड्रायव्हरची चाचणी करण्यास सांगितलं. तो टॅक्सीचालक पुण्यातील मांजरी परिसरात राहणारा आहे. त्याची चाचणी केली असता तो सुद्धा पॉझिटिव्ह आला”.
जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर सर्व माहिती घेण्याचं काम सुरु आहे. या टॅक्सी ड्रायव्हरच्या गाडीत जे जे बसले, त्याच्याशी ज्यांचा संपर्क आला त्या 7 ते 8 जणांचीही चाचणी करण्यात आली आहे. त्यांना लागण झाली की नाही ते तपासण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचे अहवाल दुपारपर्यंत येतील. त्यांना जर लागण झाली असेल तर त्याची व्याप्ती आणखी वाढू शकते, मात्र घाबरण्याचे काम नाही, जनतेने काळजी घेण्याची गरज आहे, असं अजित पवार म्हणाले.
कोरोनाबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा होईल, त्या 7 ते 8 जणांचे रिपोर्ट कसे येतात त्यावर सर्व अवलंबून आहे. मोठ्या प्रमाणात अफवा पसरविल्या जात आहेत. जर कोणाला आजार झाला तर घाबरुन जाण्याची गरज नाही, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत, असं अजित पवार यांनी सांगितलं.