देशभरात बुधवारी इंधन दरात मोठी घसरण झाल्याचे समोर आले आहे. दिल्लीत पेट्रोलच्या दरात लिटरमागे २.६९ रुपये तर डिझेलच्या किंमतीत २.३३ रुपये घसरण झाली आहे. त्यामुळे दिल्लीत आज पेट्रोल ७०.२९ रुपये व डिझेल ६३.०१ रुपये प्रति लिटर विक्री होत आहे. तर, मुंबईत पेट्रोलचा दर ७५.९९ रुपये प्रति लिटर व डिझेल ६५.९७ रुपये प्रति लिटरने विक्री केले जात आहे.
याचबरोबर कोलकाता व चेन्नई येथे पेट्रोल अनुक्रमे ७२.९८ व ७३.०२ रुपये लिटर तर डिझेल ६५.३५ व ६६.४८ रुपये प्रति लिटर विक्री केले जात आहे.
तेल उत्पादन कमी करण्यासंदर्भात ओपेक आणि रशियामध्ये एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे नव्या दर युद्धाची सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या किंमतींमध्ये तब्बल ३० टक्के घसरण झाली आहे. सौदी अरेबिया रशियाची कोंडी करण्यासाठी तेलाचे उत्पादन वाढवून किंमती कमी करणार आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये तेलाचे दर आणखी पडतील असे बोलले जात आहे. शिवाय याचा फायदा भारतासह अन्य देशांना होण्याची शक्यता आहे.
खनिज तेलाच्या दरातील घसरण ही भारताच्या पथ्यावर पडणारी आहे. आयातखर्च लक्षणीय कमी होऊन, येत्या कालावधीत आणखी इंधन दरकपात झाली तर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी ते दूरगामी फायद्याचे ठरेल. १९९१ साली आखातामध्ये झालेल्या युद्धानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात इतकी मोठी घसरण झाली आहे. जागतिक बाजारात तेलाच्या दरात घसरण होत असल्यामुळे भारतातही पेट्रोल-डिझेल स्वस्त होत आहे.