नाशिक: रक्षाबंधनासाठी जाणाऱ्या भावाच्या दुचाकीला अपघात, भावजयी ठार
नाशिक (प्रतिनिधी): रक्षाबंधनानिमित्त ओझर येथे बहिणीला भेटण्यास जाणाऱ्या भावाच्या दुचाकीला खासगी ट्रॅव्हल बसने धडक दिल्याने या अपघातात भावाची पत्नी जागीच ठार झाली. सुदैवाने या घटनेत या भावासह त्याची दोन मुले बचावली. आडगाव ट्रक टर्मिनस येथे रविवारी (दि. २९) हा अपघात घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, आणि दीपक जाेशी (रा. इंदिरानगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दीपक जोशी हे पत्नी सारिका जोशी (४५), मुले वरद व धवल असे चौघे दुचाकीने (एमएच १५ सीएफ ०९९८) मुंबई-आग्रारोडने ओझर येथे मोठ्या बहिणाला राखी पौर्णिमेनिमित्त भेटण्यास जात होते. यावेळी आडगाव ट्रक टर्मिनल येथे महमार्गावर रस्ता खोदण्याचे काम सुरू असल्याने दुचाकीचा वेग कमी करत ते पुढे जात असताना पाठीमागून आलेल्या सफेद रंगाच्या ट्रॅव्हल बसने दुचाकीला कट मारला.
यात जोशी आणि त्यांची दोन मुले रस्त्याच्या डाव्या बाजूला खाली पडले. पत्नी सारिका उजव्या बाजूला खाली पडल्याने पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाच्या चाकाखाली सापडून डोक्याचा चेंदामेंदा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोन मुले जखमी झाले त्यांना रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळताच आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह शवविच्छेदनसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. आडगाव पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.