नाशिक, ठाणे, पुणे आणि मराठवाड्यात अलर्ट, दमदार पावसाची शक्यता!

आता हवामान खात्याने नव्याने पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्यातल्या काही भागात हवामान खात्याने पावसाचा पुन्हा एकदा अलर्ट दिला आहे. नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, अहमदनगर, पुणे, जळगाव, धुळे, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आणि बीड इथे मेघगर्जनेसह येत्या 24 तासांमध्ये दमदार पाऊस होईल असा इशारा वेधशाळेने दिला आहे. राज्यातल्या अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.

जोरदार पावसामुळे राज्यातल्या अनेक नद्यांना पूर आला आहे. काही भागात तर काही तासांमध्येच प्रचंड पाऊस झाल्याने रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं होतं. तर गडचिरोलीमध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला होता. येत्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे अशी शक्यती व्यक्त केली जात आहे.

अशातच, पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठारावरील जवळपास सात हजार हेक्टर क्षेत्रावरील बटाटा पावसाच्या पाण्यात भुईसापट झाला आहे. या भागातले पावसाच्या पाण्यावर घेतले जाणारे बटाटा हे एकमेव मुख्य नगदी पीक आहे. बटाटा काढणीच्या अंतीम टप्प्यात असताना परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून रोज संध्याकाळी पडणा-या  मुसळधार पावसामुळे उरले सुरले पीक सुद्धा भुईसपाट झाले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे बटाटा काढणीसाठी मजुर मिळेनासे झाले असताना प्रचंड मिनतवारी करुन आदिवासी मजुर  स्वखर्चाने आणुन  जेवण – राहण्याची व्यवस्था करुन तब्बल 700-800 रुपये जोडी देउन बटाटा काढणी करावी लागत आहे. मात्र आता उरल्या सुरल्या आशेवर सुद्धा पावसाने आज पुन्हा पाणी फिरवले आहे.

त्यामुळे आता हवामान खात्याने नव्याने पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Loading