धर्म बदलला म्हणून जात बदलत नाही; मद्रास हायकोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निकाल

चेन्नई : मद्रास हायकोर्टाने आंतरजातीय विवाहासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

हायकोर्टाने म्हटलंय की, एखाद्या व्यक्तीने आपला धर्म सोडून दुसरा धर्म जरी स्विकारला तरीही जन्मापासून असलेली त्याची जात बदलत नाही.

याबाबतची याचिका पी सर्वानन यांनी हायकोर्टात केली होती, जे स्वत: आदि-द्रविड जातीचे आहेत, जी जात अनुसूचित जातींमध्ये येते.

त्यांनी नंतर ख्रिश्चन धर्म स्विकारल्यामुळे मागास जातीचे प्रमाणपत्र त्यांना देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी हिंदू-अरुनथथीयार या जातीच्या मुलीशी लग्न केले, ज्या जातीचा समावेश अनुसूचित जातीमध्येच होतो.

त्यांच्या या लग्नानंतर पी. सर्वानन यांनी त्यांना ‘आंतरजातीय विवाहित’ असे प्रमाणपत्र मिळावे म्हणून सेलम जिल्ह्यातील तहसीलदारांकडे अर्ज केलास होता. मात्र तो अर्ज अमान्य करण्यात आला. सेलम जिल्हाधिकारी यांनीही याविरुद्धचे अपील फेटाळून लावले. त्यानंतर पी. सर्वानन यांनी मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली. ‘आंतरजातीय विवाहित’ असल्याचे प्रमाणपत्र त्यांना मिळावं, अशी विनंती त्यांनी हायकोर्टाकडे केली. त्यांना हे प्रमाणपत्र मिळवून आंतरजातीय विवाहितांना मिळणाऱ्या शासकीय सवलती मिळवण्याची इच्छआ होती.