Whatsapp कॉल करण्यासाठीही आता मोजावे लागणार पैसे? सरकारने जाहीर केला मसुदा

मित्र-नातेवाईकांशी बोलण्यासाठी आपण जर Whatsapp कॉलिंग करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, लवकरच अशी प्रणाली देशात लागू होणार आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला Whatsapp कॉल करण्यासाठी पैसे द्यावे लागतील. लोकांची मते जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारने दूरसंचार विधेयकाचा मसुदा प्रसिद्ध केला आहे. Whatsapp, फेसबुकच्या माध्यमातून कॉल किंवा मेसेज पाठवण्याची सुविधा दूरसंचार सेवा मानली जाईल, अशी तरतूद या विधेयकात आहे. त्यासाठी या कंपन्यांना परवाना घ्यावा लागणार आहे.

देशातील दूरसंचार कंपन्या सातत्याने तक्रारी करत आहेत की, Whatsapp आणि फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना मेसेजिंग किंवा कॉलिंग सेवा पुरवली जात आहे, ज्यामुळे त्यांचे नुकसान होते. या दूरसंचार कंपन्या त्यांच्या सेवा दूरसंचार सेवेअंतर्गत येत असल्याचे सांगत आहेत. या विषयावर लोकांची मते जाणून घेण्यासाठी विधेयकाचा मसुदा सार्वजनिक करण्यात आला आहे. 20 ऑक्टोबरपर्यंत या विधेयकातील तरतुदींबाबत लोक आपली मते मांडू शकतील. लोकांचा कौल मिळाल्यानंतर हे विधेयक संसदेत मांडले जाईल. सायबर फसवणूक रोखण्यासाठीही या विधेयकात तरतूद करण्यात आली आहे.

दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, सायबर फसवणूक रोखण्यासाठी प्रस्तावित विधेयकात अशा गुन्ह्यांसाठी शिक्षेमध्ये वाढ करण्याची तरतूद करण्यात आली आहे. जामतारा, अलवर आणि नूह सारखी देशातील विविध क्षेत्रे अशा फसवणुकीसाठी कुप्रसिद्ध झाली आहेत. प्रस्तावित विधेयकात आणखी एक महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे की, कॉल घेणार्‍या व्यक्तीला कॉल करणारी व्यक्ती कोण आहे, ते ओळखता येणार आहे. यासाठी कोणतेही अॅप डाउनलोड करण्याची गरज नाही. देशातील डिजिटल प्रणाली सुव्यवस्थित करण्यासाठी आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकार दूरसंचार विधेयकाव्यतिरिक्त वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक आणि डिजिटल इंडिया विधेयकाच्या मसुद्यावरही काम करत आहे.

Loading