पुणे (प्रतिनिधी): प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या बाबतीत रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. पूजा खेडकरने तिच्या ऑडी कारमध्ये लाल दिवा लावला आणि त्यावर ‘महाराष्ट्र सरकार’ असे लिहिलेल्याचा आरोप आहे.
आता या प्रकरणात पूजा खेडकरने वापरलेली ऑडी कार वाहतूक विभागाने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात आणली आहे. पुढील तपासणी आणि कागदपत्र पडताळणीसाठी कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
पुणे आरटीओने ही कार ज्या कंपनीच्या नावावर आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी केली होती. आरटीओच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘पुणे आरटीओने गुरुवारी संध्याकाळी एका खासगी कंपनीला नोटीस बजावली.
कार क्रमांक MH-12/AR-7000 ही कंपनीच्या नावावर नोंदणीकृत होती. नोंदणी केलेल्या वापरकर्त्याचा पत्ता हवेली तालुक्यातील शिवणे गाव असा देण्यात आला आहे, त्यामुळे लवकरात लवकर तपास करता यावा, यासाठी कंपनीला नोटीसमध्ये कार पोलीस स्टेशनमध्ये आणण्याचे निर्देश देण्यात आले होते. पुणे आरटीओने आपल्या फ्लाइंग स्क्वॉडला कारचा शोध घेण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आज पोलिसांना ही कार सापडली आहे.