मुंबई (प्रतिनिधी): कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरियंटने (coronavirus new variant) पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. देशभरात कोरोनाच्या जेएन.1 (JN1) या सब व्हेरियंयचे रुग्णाचे प्रमाण वाढत आहे. जेएन.1 या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने महाराष्ट्रात शिरकाव केलाय. राज्य सरकारही अलर्ट झालेय. विविध उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यात या व्हेरियंटचा फक्त एक रुग्ण आढळलाय, पण शेजारी असणाऱ्या गोव्यात 20 च्या आसपास रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने पावली उचलली आहेत, नव्या व्हेरियंटबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. वैद्यकीय तज्ञ, डॉ. तात्याराव लहाने यांनी जेएन.1 या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, घाबरण्याचे कारण नाही, पण काळजी घ्यायला हवी.
काय म्हणाले डॉ. तात्याराव लहाने ?
नव्या जेएन 1 व्हेरियंटने घाबरून जाण्याचे कारण नाही, मात्र सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ तात्याराव लहाने यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत केले. त्यांच्यामते, जेएन.1 हा व्हेरियंट ऑगस्ट महिन्यात सापडला आहे. मात्र मागील पाच महिन्यात या व्हेरियंटने फारसा धोका निर्माण केला नाही. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.
लक्षणं कोणती ? धोका किती ?:
ओमायक्रॉननंतर जे व्हेरियंट आले त्यापासून फार धोका पाहायला मिळाला नाही. WHO ने याला व्हेरियंट म्हणून घोषित केला आहे. हा सौम्य स्वरूपाचा व्हायरस आहे. ताप येणे, नाक गळणे, जुलाब होतात यापुढे फार काही होत नाही. यापासून फुफुसाला संसर्ग होण्याचा धोका नाही. मात्र पुढे तो काय स्वरूप प्राप्त करतो ते पाहावे लागेल, असे डॉक्टर लहाने म्हणाले.
उपाय काय?:
कोरोनाच्या व्हेरियंटपासून वाचण्यासाठी मास्क हा एकमेव उपाय आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा. विमानतळावर मास्क लावणे, इम्युनिटी कमकुवत असेल तर काळजी घेणे. तसेच घशाचा त्रास असेल तर काळजी घ्यावी. चाचणीसाठी जी कोविडची पद्धती होती तीच पद्धत यासाठी देखील असेल, असे लहाने म्हणाले.
JN.1 चे गोव्यात सर्वाधिक रुग्ण:
कोरोनाच्या JN.1 या नव्या विषाणूचे रुग्ण जगभरात वेगाने वाढत आहेत. आतापर्यंत 40 देशात या नव्या विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. भारतामध्ये जेएन .1 या विषाणूचे आतापर्यंत 23 रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण गोवा येथे आढळले आहेत. गोवामध्ये जेएन.1 विषाणूचे 19 रुग्ण आढळले आहेत. राजस्थानमध्ये दोन रुग्ण आढळले आहेत. तर केरळ आणि महाराष्ट्रात जेएन.1 या कोरोना विषाणूचे प्रत्येकी एक एक रुग्ण आढळले आहेत.
केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण:
देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहेत. सध्या देशातील एकूण कोरोनबाधित रुग्णांची संख्या 2669 इतकी झाली आहे. आज देशात 358 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील 24 तासात फक्त केरळमध्ये 300 पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. केरळमध्ये तीन जणांचा मृत्यूही झलाय. केरळमध्ये मागील तीन वर्षांत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 72 हजारापेक्ष जास्त झाली.