सध्या महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे., यासाठी विधानभवनात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विधान भवनात प्रवेश करायचा असल्यास तुम्हाला अधिवेशनाचा पास असणे आवश्यक आहे. ह्या पास शिवाय आत सोडले जात नाही. पण आज खुद्द संभाजी राजे भोसले यांनाच विधिमंडळाच्या गेटवर पाससाठी तब्बल १५ ते २० मिनिटं प्रतीक्षा करावी लागली. खासदार संभाजी राजे हे आपल्या कामासाठी विधानभवनात आले होते. मात्र, त्यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या खासगी सचिवांकडे पास नसल्याने त्यांना देखील गेटवर पाससाठी प्रतीक्षा करावी लागली.
तर गेटवर असलेल्या सुरक्षा रक्षकाने या सर्व गोधळानंतर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला गेटवर बोलावले. त्यानंतर वरिष्ठांनी त्यांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या खासगी सचिवाला आतमध्ये जाण्यासाठी सांगितले. पण त्यावेळी संभाजी राजे यांनी मात्र पास आल्यावरच आम्ही आतमध्ये जाऊ, असे म्हणत विधान भवनातील सुरक्षेचे नियम पाळले.
यावर संभाजी राजे भोसले काय म्हणाले..
बऱ्याच दिवसांनंतर मी विधान भवनात आलो होतो. आत येताना खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज म्हणून मला सुरक्षा रक्षक गेटवरून आतमध्ये सोडत होते. पण माझ्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांना त्यांनी आतमध्ये जाऊ शकत नाही असे सांगितले. त्यावेळी मी त्यांना विनंती केली की मला इथले काही जास्त माहीत नाही. त्यामुळे माझ्यासोबत यांना आतमध्ये सोडा. पण त्यांनी सांगितले पास असल्याशिवाय तुमच्या सहकाऱ्यांना सोडणार नाही. नंतर त्यांच्या वरिष्ठांनी परवानगी दिली खरी, पण मीच त्यांना म्हणालो की आता पास आल्याशिवाय मी आतमध्ये जाणार नाही. मला खरच या गोष्टीचा आनंद आहे की राज्यात सुरक्षेच्या दृष्टीने चांगली सिस्टीम उभारली आहे. सर्व आमदारांनी, खासदारांनी ही सिस्टीम पाळली पाहिजे, असं संभाजी राजे म्हणाले.