27 मार्च रोजी कर्जाच्या हफ्त्यांच्या परतफेडीवर दिलेल्या स्थगितीला (Moratorium period) तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे.
नवी दिल्ली : ‘कोरोना’ व्हायरसच्या प्रादुर्भावाचा फटका बसल्याने डळमळीत झालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला बुस्टर देण्याचा प्रयत्न रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने केला आहे. रेपो रेटमध्ये 40 बेसिस पॉइंटनी घट करण्याची घोषणा आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केली. तर ईएमआय आणखी तीन महिने पुढे ढकलण्याची सवलत दिल्याने सर्वसामान्यांना आणखी दिलासा मिळाला आहे.
‘कोरोना’चा लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने तिसऱ्यांदा दिलासादायी घोषणा केल्या. आधी 27 मार्च, नंतर 17 एप्रिल रोजी रिझर्व्ह बँकेने पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी रिव्हर्स रेपो रेटही 0.40 टक्क्यांनी कमी करुन 3.35 टक्के केल्याचं दास यांनी जाहीर केलं आहे. 27 मार्च रोजी कर्जाच्या हफ्त्यांच्या परतफेडीवर दिलेल्या स्थगितीला (Moratorium period) तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे कर्जधारकांना 31 मेऐवजी 31 ऑगस्टपर्यंत ईएमआय पुढे ढकलण्यास सवलत मिळाली आहे.
कर्जाचे परतफेडीसाठी 31 ऑगस्ट 2020 पर्यंत कालावधी मिळाला असला, तरी इतके दिवस हफ्ते न भरुनही व्याज द्यावे लागणार आहे. कारण रिझर्व्ह बॅंकेने कुठल्याच बँकेला व्याज घेण्यास मनाई नाही केली.