शरद पवार, फौजिया खान राज्यसभेचा अर्ज भरणार, भाजपचा निर्णय गुलदस्त्यात !

महाराष्ट्र राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज अर्ज दाखल करणार आहेत. मुंबईत विधानभवनात पवार आपला अर्ज भरतील. काँग्रेससोबतची रस्सीखेच संपल्याने राष्ट्रवादीकडून फौजिया खानही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर शिवसेना, भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा सस्पेन्स अद्याप कायम आहे.

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी 26 मार्चला निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख शुक्रवार 13 मार्च आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार, तर भाजपचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी दोन तर काँग्रेस-शिवसेना प्रत्येकी एक जागा लढवणार आहे.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली असून आज भाजपच्या राज्यसभा उमेदवारांची घोषणाही आज होणार आहे. भाजपकडून एकनाथ खडसे आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांचं नाव निश्चित मानलं जात असलं, तरी अधिकृत उमेदवारांची नावं गुलदस्त्यातच आहेत.

शिवसेनेतही राज्यसभा उमेदवारीसाठी तिरंगी चुरस पाहायला मिळत आहे. काँग्रेसमधून आलेल्या प्रियंका चतुर्वेदी, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची नावं चर्चेत आहेत. परंतु माजी मंत्री दिवाकर रावते राज्यसभेच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जातात. महाविकास आघाडीतील चौथ्या जागेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत चढाओढ पाहायला मिळाली होती. राष्ट्रवादीने फौजिया खान यांच्या नावाची घोषणा केल्यानंतरही काँग्रेस सतीश चतुर्वेदींच्या उमेदवारीसाठी आग्रही होतं. परंतु प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी हायकमांड सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर तणाव निवळल्याचं दिसत आहे.

राज्यसभा नियुक्तीसाठी निकष काय?

राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची 37 मतं आवश्यक आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे चार तर भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येतील. शिल्लक राहिलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा आणि भाजपचा प्रयत्न राहणार आहे.

राज्यसभेच्या सात जागांबाबत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित बसून निर्णय घेणार आहेत. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत सातव्या जागेसाठी भाजपने उमेदवार दिल्यास चुरस पाहायला मिळेल. पण छोटे आणि अपक्ष सत्ताधारी पक्षाच्या बाजूने राहिल्याचं दिसून येतं. त्यामुळे भाजपला एका जागेचा फटका बसू शकतो.

Loading