Rain Alert: उद्यापासून पावसाचा जोर वाढणार; “या” ठिकाणी अति पावसाची शक्यता

सध्या राज्यात काही ठिकाणी पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे.

दरम्यान, राज्यात उद्यापासून (7 सप्टेंबर) पुढील आठ पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. 14 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात विजांच्या गडगडाटासह मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कदाचित आज रात्रीपासूनही पावसाला सुरुवात होवू शकते असेही खुळे यांनी सांगितले आहे.

गणपती विसर्जन दरम्यान पावसाचा जोर वाढणार:
सध्या मुंबईसह ठाणे परिसरात पाऊस चांगला पाऊस झाला आहे. तसेच नाशिक, नगर, औरंगाबाद, लातूर या जिल्ह्यात देखील पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान, राज्यात आणखी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 8, 9 आणि 10 सप्टेंबर (गुरुवार ते शनिवार) गणपती विसर्जन दरम्यान पावसाचा जोर अधिकच असू शकतो. त्यामुळं नागरिकांसह सिंचन विभागालाही या तीन दिवसात जागरुक रहावे लागणार असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

या ठिकाणी अति पावसाची शक्यता:
महाराष्ट्रात मुंबईसह संपूर्ण कोकणातील जिल्ह्यांमध्ये तसेच पूर्व विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ तसेच दक्षिण महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड अशा 15 जिल्ह्यात विशेषतःजोरदार ते अति पावसाचीही शक्यता जाणवत असल्याची माहिती खुळे यांनी दिली आहे.

परतीचा प्रवास लांबणीवर: मध्य महाराष्ट्रातील खान्देशापासून कोल्हापूर सोलापूर पर्यंत पुढील काही दिवस दुपारी तीन वाजता कमाल तर पहाटे पाचचे किमान असे दोन्हीही तापमाने त्या-त्या दिवसांच्या त्यांच्या सरासरी तापमानापेक्षा दोन ते अडीच डिग्रीने अधिक जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळं मध्य महाराष्ट्रातील अधिकची जाणवणारी ही उष्णता अधिक आर्द्रता निर्मिती करून स्थानिक पातळीवर उर्ध्वगमनाच्या वहनातून घडणाऱ्या वातावरणीय चलनवळणामुळे सध्याच्या जोरदार पावसासाठी अधिक पूरक ठरु शकते.

तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र तापमान सरासरी इतकेच जाणवेल. आज अमरावतीला सगळ्यात कमी किमान तापमान 21.7 अशं नोंदवले गेल्याची माहिती खुळे यांनी दिली. परतीच्या पावसासाठीचे सुरुवात झालेले अनुकूल वातावरणीय वेध सध्या स्थिरवल्यासारखे जाणवत आहे. त्यामुळं माघारी फिरणारा मोसमी पाऊस कदाचित वेळ घेण्याची शक्यताही नाकरता येत नाही.