मुंबई (वृत्तसंस्था): मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. उद्या बुधवारी कोल्हापूरमध्ये पहिला मूक आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात आता वंचित बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर सुद्धा सहभागी होणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणातली ही मोठी घडामोड ठरणार आहे.
खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी 16 तारखेला कोल्हापूरमध्ये मूक आंदोलन करण्यात येणार आहे. वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपण या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं आहे.
वंचित आघाडीने ट्वीटकरून याबद्दल माहिती दिली की, ‘उद्या दि. 16 जून रोजी कोल्हापुरात मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी खा. संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मराठा आरक्षण मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत’
विशेष म्हणजे, संभाजीराजे यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीमुळे नवीन आघाडीचा फॉर्म्युला तयार केला जात असल्याची चर्चा रंगली होती. आता खुद्द प्रकाश आंबेडकर यांच्या सहभागामुळे राज्यातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याचे चिन्ह आहे.
राष्ट्रवादीचे नेतेही होणार सहभागी:
‘कोल्हापूरमध्ये १६ तारखेला मराठा समाजाचे आंदोलन आहे. या आंदोलनात लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आंदोलनस्थळी जाणार आहोत. उद्या पालकमंत्री, हसन मुश्रीफ तिकडे जाणार आहे, ते भूमिका मांडणार आहेत. संभाजीराजेंनी सुद्धा आवाहन केलं आहे की कमीत कमी लोकांनी आंदोलनस्थळी यावं, कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे याचे भान सर्वांनी बाळगावे, असंही अजित पवार जाहीर केलं.