पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. पण आता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत लॉकडाऊन शिथील करण्यात येत आहे. 26 मे पासून पीएमपीएमएलची बस वाहतूक सेवा सुरु होणार आहे. येत्या दोन दिवसात या वाहतुकीचे वेळापत्रक तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेला रेड झोनमधून राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी वगळले आहे. त्यामुळे या शहरावरील अनेक निर्बंध आता कमी झालेले आहेत. पिंपरी-चिंचडमध्ये किमान 15 मार्गांसाठी बस सेवा सुरू होणार आहे.
पिंपरी-चिंचवडला रेड झोनमधून वगळले असले तरी पुणे शहराचा समावेश कोरोनाच्या रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे पुण्यातून पिंपरी-चिंचवडमध्ये बससेवा सुरू होऊ शकणार नाही. तसेच, पिंपरी-चिंचवडमधूनही पुण्यात बससेवा सुरू करणे शक्य नाही. पीएमपीएमएलच्या मोठ्या बसमध्ये 21 तर, मिनी बसमध्ये 14 प्रवासी प्रवास करु शकतील. तसेच प्रवाशांसाठी बसण्याचीही विशिष्ट व्यवस्था करण्यात येणार आहे. बससेवा सुरू करण्यासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे 100 बस वापरण्यात येतील. प्रवाशांच्या गरजेनुसार ही संख्या कमी-जास्त होऊ शकते.
दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये आतापर्यंत 252 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 154 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये शहरातील 142 तर शहराबाहेरील 12 रुग्णांचा समावेश आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका 21 मे 2020 पर्यंतची कोरोना पॉझिटिव्ह आणि रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची क्षेत्रीय कार्यालयनिहाय आकडेवारी :
1) प्रभाग अ – निगडी, प्रधिकरण, आकुर्डी- 48
2) प्रभाग ब – काळेवाडी, चिंचवड, रावेत- 06
3) प्रभाग क – इंद्रायणीनगर, नेहरुनगर, अजमेरा कॉलनी – 02
4) प्रभाग ड – वाकड, पिंपळे-सौदागर, ताथवडे – 04
5) प्रभाग ई – भोसरी, मोशी, चऱ्होली – 18
6) प्रभाग फ – यमुनानगर, तळवडे, चिखली – 07
7) प्रभाग ग – पिंपरी थेरगाव रहाटणी – 05
8) प्रभाग ह – दापोडी कासरवाडी सांगवी – 03