पुण्यातील कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे कारण पुण्यात आणखी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. पुण्यात आणखी एका महिला रुग्णाला कोरोना झाला असल्याची माहिती पुण्याचे जिल्हा दंडाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. त्यामुळे पुण्यात एकूण 18 तर महाराष्ट्रात 42 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. नवल किशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना झालेल्या रुग्ण महिलेचा फ्रान्स आणि नेदरलँड असा प्रवासाचा इतिहास आहे. गेल्या काही दिवसांत त्रास सुरू झाल्याने 15 तारखेला चाचण्या केल्या असता त्या पॉझिटिव्ह आल्या. रुग्णावर योग्य उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
राज्यात काल मुंबई आणि पिंपरी चिंचवड इथे प्रत्येकी एक असे दोन नवे रुग्ण आढळून आले होते. तर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यात आज पुण्यात आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्यामुळे नागिरकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशात घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांना देण्यात येत आहे.