नवी दिल्ली: कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी देशभरात लसीकरण मोहिमेचं काम सुरू आहे. यादरम्यान लसीकरणाबाबतच्या नियमांमध्ये सतत बदल होत आहेत. आता जर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला तर त्याला रिकव्हर होऊन नऊ महिने झाल्यानंतरच लस घेता येणार आहे. नॅशनल ग्रुप ऑन व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन (NEGVAC) लवकरच याबाबत निर्णय सुनावण्याची शक्यता आहे.
नुकतंच रिकव्हरीनंतर लसीकरणाचा कालावधी सहा महिने करण्यात आला होता. मात्र, आता हा आणखी वाढवून 9 महिने करण्याची शक्यता आहे. अनेक बाबींची पडताळणी केल्यानंतर तज्ज्ञांच्या टीमनं हा सल्ला दिला आहे. भारतात कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान रिइन्फेक्शनचा रेट 4.5 टक्के होता. यादरम्यान 102 दिवसांचं अंतर पाहायला मिळालं होतं.
काही देशांमध्ये करण्यात आलेल्या संसोधनात असं समोर आलं आहे, की कोरोनाची लागण झाल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत याविरोधात प्रतिकारशक्ती राहू शकते. सध्या कोरोनाच्या प्रसार सुरुच असल्यानं रिइन्फेन्शनचा धोका कायम आहे. अशात एखाद्याला पहिल्या डोसनंतर दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा करावी लागत असेल तर हे फायद्याचंही ठरु शकतं.
लसीकरणाबाबत काही दिवसांपूर्वीच नियमांमध्ये बदल झाले होते. यानुसार, आता कोरोना लसीच्या दुसऱ्या डोससाठी 12 ते 16 आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागेल. कोविन पोर्टलवरही आता दुसऱ्या डोससाठीचा पर्याय 84 दिवसांनंतरच दिसत आहे. तर, कोरोनातून रिकव्हर झालेल्या व्यक्तींना पहिले सहा महिने लस घेता येणार नव्हती. मात्र, आता हा काळ आणखी वाढवून 9 महिने केला जाऊ शकतो. तर, गर्भवती महिलांकडे डिलेव्हरीनंतर लस घेण्याचा पर्याय आहे.