कोरोना उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटवली, नवे दिशानिर्देशही जारी

मुंबई (प्रतिनिधी): देशात आता कोरोना रुग्णांवरील उपचारातून ‘प्लाझ्मा थेरपी’ हटवण्यात आली आहे. याबाबत नवे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. कोरोनाच्या उपचार पद्धतीतून प्लाझ्मा थेरपी हटवण्यात यावी, असे मत कोरोनाशी संबंधित टास्क फोर्सच्या बैठकीत सर्व सदस्यांनी व्यक्त केले होते.

कोरोनाच्या उपचारात प्लाझ्मा थेरपी प्रभावी नाही, अनेक प्रकरणांत तिचा अयोग्य वापर करण्यात आला आहे, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे होते. काही डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांना पत्र लिहून कोरोना उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटवण्याची मागणी केली होती. प्लाझ्मा थेरपीचा तर्कहीन आणि गैरवैज्ञानिक वापर केला जात आहे, असा इशाराही त्यांनी दिला होता.

असेच पत्र आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव आणि एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनाही पाठवण्यात आले होते. त्यात म्हटले होते की, प्लाझ्मा थेरपी सध्याच्या दिशानिर्देशांवर आधारित नाही. कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपीचा काहीही उपयोग नाही, हे सध्या होत असलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. तरीही देशभरातील रुग्णालयांत तिचा तर्कहीन वापर केला जात आहे.