नाशिक (प्रतिनिधी): तीन दिवसांपासून अरबी समुद्राच्या नैऋत्य भागात अतितीव्र कमी दाबाचा पट्टा तयार होऊन त्याचे तौक्ते चक्रीवादळात रूपांतर झाले असून ते गुजरात आणि पाकिस्तानच्या दिशेने जात आहे. या चक्रीवादळामुळे शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण तयार असून दिवसभर उकाड्यात वाढ झाली होती.
तर कुलाबा वेधशाळेने नाशिक जिल्ह्यासह कोकणात वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासह रविवार (दि.१६) पासून बुधवारपर्यंत धुवाधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेदेखील दखल घेत चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी नियोजन केले आहे.
अरबी समुद्रात तयार झालेले तौक्ते चक्रीवादळ गुजरात आणि पाकिस्तानच्या दिशेला जात असून त्याचा परिणाम महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि पाकिस्तानात जाणवणार आहे. नाशिक जिल्ह्यात या चक्रीवादळाचा तडाखा बसणार आहे. यादरम्यान वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता असल्याने महावितरणनेदेखील कर्मचारी सज्ज ठेवले आहे.
चक्रीवादळामुळे आगामी चार दिवसांत मराठवाडा व विदर्भात मात्र चक्रीवादळाचा विशेष परिणाम होणार नसून फक्त तुरळक ठिकाणीच विजांच्या गडागडाटासह वारे वाहण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यात पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे. रविवार ते बुधवार या चार दिवसांत बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी विजांसह सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे.
शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असून उकाड्यात वाढ झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते. चक्रीवादळादरम्यान वादळवारा आणि विजांची शक्यता अधिक असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.