कौतुकास्पद: पोलीस कोविड सेंटरमध्ये सूर्यस्नान; ६९ जणांनी केली कोरोनावर मात !

नाशिक (प्रतिनिधी): पोलिस कोविड सेंटरमध्ये बाधित रुग्णांना नियमित वॉक टेस्ट, सूर्यस्नानासह सकस आहार आणि अनुलोम, विलोम, प्राणायाम करावाच लागतो. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आजपर्यंत सेंटरमध्ये ९० रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. यातील ६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सेंटरमध्ये २१ रुग्ण उपचार घेत असून हे रुग्णदेखील बरे होण्याच्या प्रगतिपथावर आहेत.

पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांच्या पुढाकाराने पोलिस कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी पोलिस कोविड सेंटर सुरू केले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २३ मार्च रोजी हे सेंटर पुन्हा कार्यान्वित करण्यात आले. या सेंटरमध्ये १०० बेड आहेत. यातील ६ ऑक्सिजन बेड आहेत.

कोरोनाच्या लाटेत १००८ पोलिस कर्मचारी आणि अधिकारी यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. यात २६२ पोलिस आणि त्यांचे नातेवाईक पॉझिटिव्ह आढळून आले. ९० रुग्ण सेंटरमध्ये दाखल झाले. सेंटरमध्ये पोलिस आयुक्त पांडेय यांनी सुरू केलेली उपचार पद्धतीचा अवलंब यात अनुलोम, विलोम प्राणायाम, सकस जेवण, उकडलेल्या भाज्या, हंगामी फळे, काळी मिरी, हळदयुक्त दूध, योगासन आणि सहा मिनिटे वॉक टेस्ट करण्यात येते. या टेस्टनंतर रुग्णाच्या पुढील उपचारासाठी दिशा ठरवली जाते. सेंटरमध्ये २१ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. यात १३ पुरुष ८ महिला रुग्णांचा समावेश आहे.

योग्य आहार अन् उपचारपद्धती याचमुळे रुग्ण लवकर बरे
पोलिस कोविड सेंटरमध्ये रुग्णांना योग्य आहार दिला जातो. व्यायाम, योगासन, सूर्यस्नान या नैसर्गिक उपचार पद्धतीमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने व्यायामास महत्त्व द्यावेच. -दीपक पांडेय, पोलिस आयुक्त