राज्यातलं महाविकासआघाडी सरकार येत्या ११ दिवसांमध्ये कोसळेल, असं भाकित भाजपचे खासदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी वर्तवलं आहे.
राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिनही पक्षांच्या महाविकासआघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासूनच हे तीन पायांचं सरकार असल्याची टीका करत विरोधकांनी ते कधीही कोसळू शकेल, अशी टीका केली होती. आता मात्र राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळलेल्या आणि शिवसेना पक्षात कारकिर्द गाजवलेल्या एका नेत्यानेच ‘हे सरकार फार काळ टिकणार नाही, फार तर फार येत्या ११ दिवसांमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं महाविकासआघाडी सरकार कोसळेल’, असं भाकित या नेत्याने केलं आहे. आणि हे नेते म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे.
नारायण राणेंनी भिवंडीमध्ये पत्रकारांशी बोलताना महाविकासआघाडी सरकारमधील पक्षांवर जोरदार टीका केली. आजपासूनच विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर नारायण राणेंनी सरकारच्या भवितव्याबद्दल भाकित वर्तवलं असल्यामुळे त्यावर चर्चा सुरू झाली आहे. ‘राज्यात सध्या सत्तेत असलेलं महाविकासआघाडी सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकत नाही. या तिनही पक्षांतले लोक फक्त सत्तेसाठी एकत्र आहे आहेत’, असं राणे म्हणाले. तसेच, ‘येत्या ११ दिवसांत हे सरकार कोसळेल’, असं भाकितही राणेंनी वर्तवलं आहे.