महाराष्ट्रात थैमान! कोरोनाग्रस्तांचा आकडा गेला 300 पार, एकट्या मुंबईत वाढले 67 रुग्ण

मुंबई, 31 मार्च : महाराष्ट्रात एका दिवसात 72 कोरोनाव्हायरसचे नवे रुग्ण दाखल झाले आहेत. ही एका दिवसातली आतापर्यंतची सर्वांत मोठी संख्या आहे. देशभरात कुठल्याही एका राज्यात एकदम एवढ्या संख्येने रुग्णांमध्ये वाढ झालेली नाही. आता राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 302 झाला आहे.

आजचा दिवस राज्यासाठी धक्कादायक ठरला. संपूर्ण राज्य लॉकडाउन असतानाही एकदम 72 ने रुग्णसंख्या वाढली. 230 वरून आकडा थेट 302 झाला आहे. एकट्या मुंबई आणि परिसरात (MMR)67 रुग्ण वाढले आहेत. ही एका दिवसातली आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. यातले खुद्द मुंबईतले 59 रुग्ण आहेत. तर पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, वाशी, विरार इथे प्रत्येकी 2 रुग्ण वाढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्याचा एकूण आकडा 72 ने वाढला आहे.

मुंबईत सर्वाधिक कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात. याच कस्तुरबा रुग्णालयातल्या  एका कर्मचारी महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. कस्तुरबा इथं आयाबाई म्हणून काम करणारी 44 वर्षीय महिला संक्रमित झाली आहे.

कोरोनामुळे सोमवारी दोन जणांचा मृत्यू

राज्यात सोमवारी कोरोनाव्हायरसमुळे 2 रुग्णांचे मृत्यू झालेत. मुंबईतल्या फोर्टिस रुग्णालयात 78 वर्षीय कोरोनाग्रस्त व्यक्तीवर उपचार सुरू होते. या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यांना रक्तदाब आणि हृदयरोग होता. शिवाय पुण्यातही एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात 52 वर्षांच्या रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ही व्यक्ती सुरुवातीपासूनच अत्यवस्थ असल्याची माहिती आहे. पुण्यातील कोरोनाग्रस्ताचा हा पहिला मृत्यू आहे. राज्यातील 39 रुग्णांची तब्येत बरी झाली, त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Loading