विद्यमान मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना दोन वेळा मिळालेली मुदतवाढ येत्या 29 फेब्रुवारी रोजी संपत आहे. त्यामुळे त्यांच्यानंतर कुणाला पोलीस आयुक्तपद मिळणार याच्यावर लक्ष लागून आहे !
या पदासाठी आयपीएस अधिकार्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झालेली आहे. मुंबई पोलीस आयुक्तपद यावेळी कोणत्याही लॉबिंगशिवाय ज्येष्ठतेनुसार द्यावे यावर तीनही पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत झाले असून, तसे झाल्यास लॉबिंग करणार्या अधिकार्यांना दणका मिळण्याची शक्यता आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील सुमारे अर्धा डझन निर्णय आतापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बदलले आहेत. त्यातच फडणवीस यांच्या पाच वर्षाच्या काळात क्रिम पोस्ट मिळालेल्या पोलीस अधिकार्यांना झटका देण्याच्या तयारीत मुख्यमंत्री ठाकरे आहेत. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतीत सर्वात वर नाव असलेले अॅन्टी करप्शन ब्युरोचे महासंचालक परमबीर सिंग यांचे नाव पिछाडीवर पडले असून, पुण्याचे पोलीस आयुक्त के. व्येंकटेशम यांनाही पुण्यातच ठेवण्याबाबत एकमताचा सूर विधानभवनात बुधवारी ऐकायला मिळाला.