चांदबागमध्ये झालेल्या दंगलीदरम्यान आयबी अधिकाऱ्याची हत्या

नवी दिल्ली- दिल्लीमध्ये मागील चार दिवसांपासून प्रचंड हिंसाचार भडकला आहे. यात आतापर्यंत 20 जणांच मृत्यू झाला आहे. यातच आता एका गुप्तचर विभागातील अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आज(बुधवार) दिल्लीतील चांदबागमध्ये आयबी (इंटेलिजंस ब्यूरो)मधील अंकित शर्मा या अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला आहे. दगडफेकीदरम्यान त्यांची हत्या करुन, मृतदेह चांदबागमधील एका नाल्यात फेकून दिला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, आयबी अधिकारी अंकित शर्मा चांदबागमध्येच राहत होते. ते आपल्या ड्यूटीवरुन घरी परत येत होते, पण यावेळी दंगल पेटल्यानंतर ते माहिती गोळा करण्यासाठी गेले. अंकित यांच्या कुटुंबाने एका स्थानिक नगरसेवकावर हत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे. 25 वर्षीय अंकित शर्मा आयबीमध्ये सिक्योरिटी असिस्टंटच्या पोस्टवर कार्यरत होते.

शर्मा यांचा मृतदेह पोलिसांनी चांदबाग पुलाजवळील नाल्यातून बाहेर काढला. आरोप आहे की, मंगळवारी ते ड्यूटीवरुन घरी परत येत असताना चांदबाग पुलावर काही लोकांनी त्यांना घेरले आणि त्यांची हत्या करुन मृतदेह नाल्यात टाकला. अंकित यांचे वडील रविंदर शर्मादेखील आयबीमध्ये हेड कांस्टेबल आहेत. त्यांनी एका आप नेत्याच्या समर्थकांवर हत्येचा संशय व्यक्त केला आहे. सध्या पोलिसांनी अंकित यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला आहे.

Loading