अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही? सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं

दहावी बारावीचे शेवटचे पेपर रद्द झाले आणि निकालही लागला मात्र अंतिम वर्षाचे विद्यार्थी अडकले. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे अंतिम वर्षाच्या जवळपास सर्वच विषयांचे पेपर अडकल्यानं परीक्षा घ्यायच्या की नाही हा विषय सध्या न्यायप्रविष्ट आहे. सर्व विद्यार्थी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत.

शुक्रवारी झालेल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं हा खटला तात्पुरता स्थगित केला असून यावर 10 ऑगस्टला पुन्हा सुनावणी घेण्यात येणार असल्याचे निर्देश दिले आहेत. महाविद्यालयांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेबाबत आजच्या सुनावणीत कोणतेही निर्देश देण्यात आले नाहीत.

यूजीसीने परीक्षा रद्द करण्याऐवजी दोन आठवड्यांपूर्वी सुधारित परीक्षा मार्गदर्शक सूचना जारी करून प्रतिसाद दिला. आता यूजीसीने सुप्रीम कोर्टाला सांगितले आहे की 30 सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे निर्देश ‘विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षित करण्यासाठी’ देण्यात आले होते. याविषयावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.

शुक्रवारी झालेल्या सुनावणीत विद्यार्थ्यांच्या वतीने अ‍ॅड. अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, UGCचे आदेश काळजीपूर्वक केले गेले नाहीत. कोरोनाचा वाढता आकडा आणि संसर्गाचा धोका अशा स्थितीत विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाहीत. सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्रात राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीने घेतलेल्या निर्णयाची प्रत कोर्टाने नोंदवण्यास सांगितले आहे. त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी सुनावणी होईल.

या प्रकऱणी केंद्रीय गृहमंत्रालयाचं म्हणणं मांडण्यासाठी सुप्रीम कोर्टानं वेळ वाढवून दिली असून पुढील सुनावणी 10 ऑगस्ट रोजी होणार आहे. तोपर्यंत यूजीसीच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणीही फेटाळली आहे. त्यामुळे आता परीक्षा होणार का? असा प्रश्नही डोकं वर काढत आहे. 10 ऑगस्टला होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News